जळगाव जिल्ह्यात सुवर्ण व्यवसायातील आठ कोटींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:20 IST2021-08-24T04:20:49+5:302021-08-24T04:20:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सुवर्ण अलंकारांसाठी हॉलमार्किंगसह प्रत्येक वस्तूंची नोंद ठेवण्यासाठी ‘ह्युड’चीदेखील (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) सक्ती केल्याच्या ...

जळगाव जिल्ह्यात सुवर्ण व्यवसायातील आठ कोटींची उलाढाल ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सुवर्ण अलंकारांसाठी हॉलमार्किंगसह प्रत्येक वस्तूंची नोंद ठेवण्यासाठी ‘ह्युड’चीदेखील (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) सक्ती केल्याच्या निषेधार्थ सुवर्ण व्यावसायिकांनी सोमवार, २३ ऑगस्ट रोजी एक दिवसीय बंद पाळला. या जाचक निर्णयाविरोधात जळगाव शहरातील १५०, तर जिल्हाभरातील दोन हजार सुवर्ण दुकाने बंद होती. यामुळे जिल्हाभरात सुवर्ण व्यवसायातील जवळपास आठ कोटींची उलाढाल ठप्प झाली. बंद दरम्यान सुवर्णपेढ्यांसमोर बंदचे फलक लावण्यात आले होते.
सुवर्ण अलंकारांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्किंगची सक्ती करण्यात आली आहे. यासोबतच केंद्र सरकारने सुवर्ण व्यवसायासाठी त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक दागिन्याची नोंद ठेवण्याची सक्ती केली आहे. यासाठी ‘ह्युड’ (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) कायदा लागू करण्यात येणार आहे. यामध्ये सुवर्ण व्यावसायिकांकडे जितके अलंकार, सोने-चांदी आहे, त्याची नोंद ठेवावी लागणार आहे. या नोंदीच्या व्यतिरिक्त जास्त वस्तू सापडल्यास संबंधित सुवर्ण व्यावसायिकावर कारवाई केली जाऊ शकते. यासाठी अबकारी खात्याकडून तपासणी केली जाणार आहे.
याला विरोध म्हणून देशभरात सुवर्ण व्यावसायिकांनी सोमवारी बंद पाळला. यामध्ये महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनला पाठिंबा देत जळगाव जिल्हा सराफ असोसिएशन व जळगाव शहर सराफ असोसिएशनने एक दिवस बंद पाळला. या बंदमुळे सोमवारी एकही सुवर्णपेढी उघडली नव्हती. एरव्ही सुवर्णनगरीत खरेदीसाठी वर्दळ असते. मात्र सोमवारी बंदमुळे सोने-चांदीचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. यामुळे जिल्हाभरात जवळपास आठ कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गौतमचंद लुणिया, जळगाव शहर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अजयकुमार ललवाणी, सचिव स्वरूप लुंकड यांनी दिली.