एक दिवसाच्या वाढीनंतर सोने-चांदीत पुन्हा घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:28 IST2021-03-04T04:28:48+5:302021-03-04T04:28:48+5:30
जळगाव : गेल्या आठवड्यापासून घसरण होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात सोमवारच्या एक दिवसाच्या भाववाढीनंतर मंगळवारी पुन्हा मोठी घसरण झाली. यामध्ये ...

एक दिवसाच्या वाढीनंतर सोने-चांदीत पुन्हा घसरण
जळगाव : गेल्या आठवड्यापासून घसरण होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात सोमवारच्या एक दिवसाच्या भाववाढीनंतर मंगळवारी पुन्हा मोठी घसरण झाली. यामध्ये चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांनी घसरण होऊन ती ६८ हजार ५०० रुपयांवर आली. अशाच प्रकारे सोन्याच्याही भावात ८०० रुपयांनी घसरण होऊन ते ४६ हजार २०० रुपयांवर आले. सट्टाबाजारात मोठ्या उलाढालीने सुवर्णबाजार अस्थिर झाला असून व्यावसायिकही चिंतीत झाले आहे.
चांदी ६८ हजाराच्या खाली
गेल्या आठवड्यात गुरुवारनंतर सोने-चांदीच्या भावात घसरण झाली. त्यात सोमवार, १ मार्च रोजी केवळ काहीसी वाढ झाली होती. मात्र मंगळवार,२ मार्च रोजी पुन्हा सोमवारच्या भाववाढीपेक्षा अधिक घसरण झाली. सोमवारी ६९ हजारावर असलेल्या चांदीच्या भावात मंगळवारी एक हजार ५०० रुपयांनी घसरण होऊन ती ६७ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. त्यामुळे चांदी आता ६८ हजार रुपयांच्या खाली आहे. अशाच प्रकारे सोमवारी ४७ हजारावर असलेल्या सोन्याच्या भावात मंगळवारी ८०० रुपयांनी घसरण होऊन ते ४६ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
सट्टा बाजाराने वाढली चिंता
डॉलरचे दर वाढले की सोने-चांदीचेही भाव वधारतात तर डॉलर घसरला की हे दरही कमी होतात. मात्र गेल्या तीन दिवसांपासून उलट चित्र आहे. शनिवारी डॉलरचे दर वाढून ७३.६० रुपयांवर पोहचले मात्र त्या वेळी सोने-चांदीत घसरण झाली. सोमवारी डॉलरचे दर कमी होऊन ७३.३८ रुपयांवर आले मात्र या दिवशी सोने-चांदी वधारले. मंगळवारीही डॉलरचे दर काहीसे वाढून ७३.४० रुपयांवर पोहचले असताना सोने-चांदीच्या भावात घसरण झाली. सट्टाबाजारात अचानक खरेदी-विक्री कमी-जास्त केली जात असल्याने सुवर्णबाजारात ही अस्थिरता निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
—————-
सध्या लग्नसराईअभावी सोने-चांदीला मागणी कमी आहे. मात्र सट्टाबाजारात होणाऱ्या कमी-अधिक उलाढालीने सोने-चांदीच्या भावावर परिणाम होत आहे.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सराफ बाजार असोसिएशन.