सोने पुन्हा पन्नास हजारांच्या पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:24 IST2020-12-05T04:24:22+5:302020-12-05T04:24:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यापासून घसरण होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ सुरू झाली आहे. ५० हजार ...

सोने पुन्हा पन्नास हजारांच्या पुढे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या आठवड्यापासून घसरण होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ सुरू झाली आहे. ५० हजार रुपयांच्या खाली गेलेले सोने शुक्रवार, ४ नोव्हेंबर रोजी पुन्हा ५० हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. चार दिवसात सोन्यात एक हजार ५०० रुपयांनी वाढ झाली. चांदीच्या भावात पाच दिवसात पाच हजार रुपयांनी वाढ होऊन ती ६० हजार रुपयांवरून थेट ६५ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढत असल्याने भाव वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पन्नास हजार रुपयांच्या पुढे असलेल्या सोन्याच्या भावात २७ नोव्हेंबरपासून घसरण सुरू झाली. हे भाव कमी कमी होत जाऊन ३० नोव्हेंबर रोजी ४८ हजार ७०० रुपयांपर्यंत आले होते. त्यानंतर मात्र १ डिसेंबर रोजी हेच भाव कायम राहून २ रोजी ९०० रुपयांनी वाढ होऊन सोने ४९ हजार ६०० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर ३ डिसेंबर रोजी सोने ५० हजार रुपयांवर पोहोचले. ४ रोजी पुन्हा त्यात २०० रुपयांनी वाढ होऊन सोने ५० हजार २०० रुपये प्रतितोळा झाले. अशाच प्रकारे चांदीचे भाव कमी कमी होत जाऊन ३० नोव्हेंबर रोजी ६० हजार रुपयांवर आले होते. मात्र १ डिसेंबर रोजी ती ६१ हजार, २ रोजी ६३ हजार, ३ रोजी ६४ हजार व आता ४ डिसेंबर रोजी ती ६५ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचले.
लग्नसराई सुरू झाल्याने सोने-चांदीला मागणी वाढू लागल्याने ही भाववाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.