जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST2021-07-23T04:11:44+5:302021-07-23T04:11:44+5:30
कजगाव, ता. भडगाव : चाळीसगाव ते पंढरपूर-अक्कलकोट-तुळजापूर सायकलवारी ‘भेटी लागी जीवा ... लागलीसे आस..’ अशी तीव्र ओढ मनात ...

जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा !
कजगाव, ता. भडगाव : चाळीसगाव ते पंढरपूर-अक्कलकोट-तुळजापूर सायकलवारी ‘भेटी लागी जीवा ... लागलीसे आस..’ अशी तीव्र ओढ मनात घेऊन चाळीसगावच्या सहा सायकलस्वारांनी श्री दत्तगुरू व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सायकलला पंढरपूरच्या दिशेने पायडल मारले.
चाळीसगाव येथील टोनी पंजाबी, अरुण महाजन, रवींद्र पाटील, कवी तथा पत्रकार जिजाबराव वाघ, सोपान चौधरी व लीलाधर पाटील या सहा सायकलवीरांना हे सहा दिवस अतिशय विलक्षण होते. सहा दिवसात १०२० किलोमीटर सायकलच्या प्रवासात अनेक अनुभव घेता आले. आजही लोकांमध्ये माणुसकी किती आहे, ते प्रत्यक्ष अनुभवले तर प्रवासात तीन अपघातग्रस्तांवर उपचार करता आले.
चाळीसगाव ते पंढरपूर या प्रवासात शेवगावच्या काही अंतरावर मोटारसायकलवर असलेल्या बहीण भावाच्या मोटरसायकलला अपघात झाल्याने ते रस्त्यावर पडले असता सायकलवीरांकडे असलेल्या प्रथमोपचार पेटीतून त्या जखमी बहीण भावावर जागेवर मलमपट्टी करण्यात आली. तसेच मोहोळ येथे शेडचे काम सुरू असताना त्या शेडवरून एक व्यक्ती पडल्यामुळे जखमी झाला होता. अक्कलकोट सोलापूर महामार्गावर पती पत्नीचा अपघात झाल्याने ते जखमी झाले होते. या दोघांवर तत्काळ उपचार करू शकलो, याचे मोठे समाधान लाभल्याचे या सायकलवीरांनी सांगितले.
अनेक ठिकाणी या सायकलवीरांचा सत्कार करण्यात आला तर शेवगाव येथे डॉ. संजय लढा, डॉ. मनीषा लढा यांच्याकडे मिरजगाव येथे अमोल कासवा तर पंढरपूर अक्कलकोट महामार्गावर प्रमोद गुळेचा यांच्या मित्राच्या वतीने पाहुणचार देण्यात आला. अत्यंत घरच्या सदस्यांसारखा पाहुणचार तिन्ही ठिकाणी मिळाला. चाळीसगाव पंढरपूर हा प्रवास पूर्ण झाला आणि सायकलवीरांना अखेरीस ते सावळे रुप..पाहून जीवास हरिक वाटला.
एकूण १०२० किमीची सायकलवारी पूर्ण करुन २० रोजी मंगळवारी रात्री १० वाजता देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन पर्वणीवर साडेतीनशे वर्षाची परंपरा असणाऱ्या विठ्ठल मंदिरात वारीची सांगता केली. यावेळी चाळीसगावकरांनी जल्लोषात स्वागत केले.
220721\22jal_3_22072021_12.jpg
पंढरपुरात चंद्रभागेला नमन करताना चाळीसगावचे हौशी सायकलिस्ट जिजाबराव वाघ यांच्यासह इतर.