मान-सन्मान द्या, नाही तर..., राष्ट्रवादीचा भाजपला इशारा, जिथे ताकद वाढेल, तिथे दावा ठोकू
By सुनील पाटील | Updated: March 30, 2024 18:33 IST2024-03-30T18:33:29+5:302024-03-30T18:33:36+5:30
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अजित पवार गटाचा जिल्हा मेळावा शनिवारी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात झाला. त्यात अध्यक्षीय भाषणात मंत्री पाटील बोलत होते.

मान-सन्मान द्या, नाही तर..., राष्ट्रवादीचा भाजपला इशारा, जिथे ताकद वाढेल, तिथे दावा ठोकू
जळगाव : महायुती म्हणून लढत असताना ज्या पक्षाचा उमेदवार आहे, त्यांनी घटक पक्षाला विश्वासात घेतले पाहिजे. जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात भाजपाकडून विश्वासात घेतले जात नसेल तर आम्हीही आमच्या स्टाईलने वागू असा इशारा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी शनिवारी भाजपला दिला. या निवडणुकीच्या माध्यमातूनच पक्ष वाढविण्याची संधी आहे, जेथे आपली ताकद वाढेल तेथे थेट दावा ठोकल्याशिवाय राहणार नाही, मग ती निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्था असो कि विधानसभा. महायुतीचा मेळावा होईल तेव्हा आपल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांचे फोटो असायलाच हवे, नसेल तर तेथे पाय ठेवण्याची आवश्यकता नाही असेही पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अजित पवार गटाचा जिल्हा मेळावा शनिवारी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात झाला. त्यात अध्यक्षीय भाषणात मंत्री पाटील बोलत होते.
मेळाव्याच्या सुरुवातील महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, रावेर मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दोन्ही मतदारसंघात उमेदवार व भाजपच्या लोकांकडून आपल्याला विश्वासात घेतले जात नाही. मान, सन्मान मिळत नसल्याचे मुद्दे मांडले. त्यावर मंत्री अनिल पाटील यांनी मला मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांचा फोन आला होता. राष्ट्रवादीची ताकद जिल्ह्यात आहे. आम्हाला गृहीत धरायचे नाही. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मान-सन्मान हवा तोपर्यंत ते काम करणार नाहीत तो त्यांना मिळायलाच हवा असे मी त्यांना सांगितले आहे. त्यावर तीनही पक्षाची जिल्हा व तालुका स्तरावर समन्वय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खडसे आता कोथडीचे नेते
एकनाथ खडसेंचा आपण नेहमी आदर करतो. पण अलिकडे त्यांनी मी चार महिन्याचा मंत्री असल्याचे म्हटले. मुळात मला आमदारच व्हायचे होते, पण मंत्रीपदाची संधी मिळाली. त्यामुळे चार दिवस अन् चार महिने राहिलो तरी समाधानी आहे आणि राहिल. तुम्ही तर राज्याचे नेते होते. तुम्हाला तर राष्ट्रवादीतही कोणी घेत नव्हते. ज्या सभागृहाचे आमदार झाले, त्यात माझेही एक मत होते. इतर आमच्याच आमदारांचेही आहेत. आम्ही मतदान केले नसते तर कोथडीतच पाय चेपत बसले असते, आता तुम्ही कोथडीचेच नेते राहिले अशी टिका अनिल पाटील यांनी केली.