प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने जळगाव शहरात प्रियकराने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 22:38 IST2018-02-27T22:38:29+5:302018-02-27T22:38:29+5:30
प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने धीरज पद्माकर चौधरी (वय २६) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी धीरज याने तीन पानांची चिठ्ठी लिहिलेली असून पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. दरम्यान, धीरज हा भाजपा मंडळ- ५ चा उपाध्यक्ष होता.

प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने जळगाव शहरात प्रियकराने घेतला गळफास
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, २७ : प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने धीरज पद्माकर चौधरी (वय २६) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी धीरज याने तीन पानांची चिठ्ठी लिहिलेली असून पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. दरम्यान, धीरज हा भाजपा मंडळ- ५ चा उपाध्यक्ष होता.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, धीरज हा विसनजी नगरातील मंदार डिस्ट्रीब्युटर्स या होलसेल औषधी विक्रीच्या दुकानावर कामाला होता. मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत तो कामावर होता. तेथून घरी गेल्यानंतर पंख्याला दोरी बांधून त्याने दीड वाजेच्या सुमारास गळफास घेतला. आई सुनंदा व वडील पद्माकर रघुनाथ चौधरी हे भुसावळ येथे नातेवाईकाकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले होते. दुपारी अडीच वाजता ते घरी आले असता पहिल्या खोलीत वडील शर्ट काढायला लागले तर दुसºया खोलीत आई गेली असता धीरज याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
चिठ्ठी व मोबाईल जप्त
दरम्यान, रामानंद नगर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच्या खिशात तीन पानांची चिठ्ठी आढळून आली. ही चिठ्ठी व मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला तर हातातील अंगठ्या व पाकीट पालकांना परत केले. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. सायंकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर साडे सात वाजता धीरजवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ऐनवेळी लग्नास दिला नकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज याचे एका नर्स असलेल्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोन्हीही एकाच समाजाचे असल्याने धीरजच्या घरातून लग्नास होकार होता. मुलीचाही या लग्नास होकार होता, मात्र ऐनवेळी कुटुंबातून नकार मिळाल्याने तसा निरोप तिने धीरजला दिला होता, त्यामुळे धीरज प्रचंड तणावाखाली आला होता. त्यातूनच त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी धीरज याचे प्रेयसीशी बोलणे झाले आहे.