नदीच्या पुराने घेतला मुलीचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST2021-09-08T04:22:54+5:302021-09-08T04:22:54+5:30
अमळनेर : बोरी नदीला पूर आलेला... सात्री गावातून येण्या-जाण्यास नदीवर पूल नाही... अशात या गावातील १३ वर्षांची मुलगी तापाने ...

नदीच्या पुराने घेतला मुलीचा बळी
अमळनेर : बोरी नदीला पूर आलेला... सात्री गावातून येण्या-जाण्यास नदीवर पूल नाही... अशात या गावातील १३ वर्षांची मुलगी तापाने फणफणत होती. ...गावात डॉक्टर नाही... अखेरचा प्रयत्न म्हणून तिला उपचारसाठी बाहेरगावी नेण्यासाठी नदी काठावर आणले... काहीतरी प्रयत्न करू... पण दुर्दैव...! तेथेच नदीकाठी त्या निष्पाप बालिकेचा मृत्यू झाला... आदिवासी आरुषीचा करुण अंत झाल्याने गाव हळहळला.
तालुक्यातील सात्री येथे आरुषी सुरेश भिल (१३) ही मुलगी तापाने आजारी होती. मात्र, बोरी नदीला पूर आलेला. वर्षानुवर्षे हे गाव अशा वेळी पूल नसल्याने जीव धोक्यात घालून नदी ओलांडते. मात्र, मंगळवारी ७ रोजी सकाळी पूर जास्तच असल्याने मुलीला वेळेत दवाखान्यात नेता आले नाही, तर डॉक्टरला गावात आणता आले नाही. ७ रोजी सकाळी मुलीचा ताप वाढला व ती अत्यवस्थ झाल्याने कसे तरी तिला खाटेवर टाकून ट्युबच्या साहाय्याने नदी ओलांडू म्हणून नदी काठावर आले. मात्र, आरुषीचे दुर्दैव आड आले. तिचा झटका येऊन तेथेच मृत्यू झाला. आई-वडिलांनी आक्रोश केला, पण तरीही तिचा मृत्यू झाला की नाही? याची खात्री पटावी, यासाठी चार-पाच लोकांनी मोटारसायकलचे ट्यूब टाकून स्वतःच जीव धोक्यात टाकून बोरी नदी पार केली. मात्र, तिला दवाखान्यात डॉक्टरांनी तपासले असता मृत घोषित केले. केवळ मार्ग बंद झाल्याने या मुलीचा जीव गेला. यामुळे संतापही व्यक्त होत आहे.
गावाचे आठ वर्षांपासून
पुनर्वसन रखडले
सात्री गाव हे निम्न तापी प्रकल्पात आलेले गाव आहे. आठ वर्षांपासून पुनर्वसन रखडले आहे. नदीला पूर आल्यास गावातून बाहेर निघायला जागाच नसते. दोनच दिवसांपूर्वी अप्पर जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी हे नव्या पुनर्वसित गावठाणाला भेट देऊन गेले. त्यावेळी माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी गावात व्हायरल तापाचे रुग्ण आहेत व त्यांना दवाखान्यात कसे नेऊ? आम्ही जगावे की मरावे? असा संतप्त सवाल केला होता. मात्र, निगरगट्ट प्रशासनाला जाग आली नाही. गावात डॉक्टर पाठविले नाही किंवा गावात जायला आपत्ती व्यवस्थापनाची बोटही पाठविली नाही. आज एका मुलीचा अंत झाला आहे. आणखी किती बळी प्रशासन घेणार, असा सवाल व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी आदिवासी बांधवांना घरपोच देण्यात येणारी खावटीही त्यांना नदीतून जाऊन डांगरी येथून आणावी लागली होती. याबाबत ‘लोकमत’ ने प्रकाश झोत टाकला होता. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना, तब्बल ७५ वर्षांपासून पूल नाही आणि गावात जायला रस्ता नाही, यापेक्षा विदारक चित्र काय असेल.
(आरुषीचे प्रेत आणले प्रांत कार्यालयात/ वृत्त रिजन अपडेटवर)