भूमी अभिलेख कार्यालयात सामान्यांची फरपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST2021-06-26T04:13:02+5:302021-06-26T04:13:02+5:30
भुसावळ : भूमी अभिलेख कार्यालयात सामान्य नागरिकांची फरपट थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे करण्यात आली आहे. राष्ट्रवादी ...

भूमी अभिलेख कार्यालयात सामान्यांची फरपट
भुसावळ : भूमी अभिलेख कार्यालयात सामान्य नागरिकांची फरपट थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे शहराध्यक्ष नीलेश कोलते यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, शेती, जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना जमीन मोजणी याशिवाय खरेदी-विक्री झालेल्या मालमत्तेचे फेरफार करण्यासाठी, नकाशा, उतारा, आखीव पत्रिका इत्यादी कागदपत्रे तसेच मोजणीसाठी व इतर प्रकरणांसाठी भूमी अभिलेख कार्यालयात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व व्यावसायिक मोजणी शुल्क भरतात. परंतु ही कामे ठरावीक कालावधीत पूर्ण होत नाहीत. भुसावळ उपविभागीय अधिकारी यांनी त्वरित या समस्येवर तोडगा काढावा.
भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांची महत्त्वाची पदे रिक्त आहेत. कारण अधिकारीसुद्धा नियमित येत नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत आणि याचा फटका नागरिकांना बसत असून, रखडलेल्या प्रकरणांचा ताण वाढला आहे. या कार्यालयात अधिकारी नियमित उपस्थित राहत नसल्याने सर्वसामान्यांना आर्थिक व मानसिक त्रास सोसावा लागत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्रात भूमी अभिलेख विभाग अद्ययावत व डिजिटायझेशनकडे वाटचाल करण्याच्या तयारीत असताना भुसावळ येथील कार्यालयात मात्र मोजणी, फेरफारसह प्रकरणे प्रलंबित असल्याने सामान्य नागरिकांची फरपट सुरू आहे. या सर्व प्रणाली नियमित वेळेत पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करून नागरिकांना होणारा त्रास थांबला पाहिजे, ही नागरिकांची अपेक्षा आहे, असे नीलेश कोलते म्हणाले. या वेळी विवेक चौधरी, शेख वाजीद, हेमंत इंगळे, विशाल सुरवाडे, बबलू कोचुरे, अक्षय पाटील उपस्थित होते.