मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांचा ‘महाव्यवस्थापक सुरक्षा’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:21 IST2021-09-16T04:21:41+5:302021-09-16T04:21:41+5:30
भुसावळ : रेल्वे ऑपरेशन्समध्ये अनुचित घटना टाळण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यात योगदान असलेल्या मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना (मुंबई विभागातून ...

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांचा ‘महाव्यवस्थापक सुरक्षा’ पुरस्कार
भुसावळ : रेल्वे ऑपरेशन्समध्ये अनुचित घटना टाळण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यात योगदान असलेल्या मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना (मुंबई विभागातून तीन आणि नागपूर, पुणे, सोलापूर आणि भुसावळ विभागातून प्रत्येकी दोन) "महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार" प्रदान केला. यात भुसावळचे बबलू शेख मोहिउद्दीन व परशुराम यादव यांचा समावेश आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी यांच्या हस्ते मुंबईत १३ रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
पुरस्कारात प्रशस्तिपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्र आणि दोन हजार रुपये रोख आहे. ऑगस्ट २०२१ महिन्यात कर्तव्यावर असताना संभाव्य रेल्वे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या सुरक्षा श्रेणीतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सतर्कतेसाठी आणि त्वरित केलेल्या कारवाईसाठी निवडले गेले.
भुसावळ येथील पॉइंट्समन परशुराम यादव यांनी खेरवाडी स्थानकात ०४१५२ डाउन विशेषच्या तृतीय वातानुकूलित डब्ब्याच्या बॅटरी बॉक्समध्ये आग पाहिल्यामुळे मोठी अनुचित घटना टळली. तसेच भुसावळ यार्डमध्ये तुटलेली टंग रेल (रूळ) लक्षात आणणारे भुसावळ यार्डचे बबलू शेख मोहिउद्दीन यांना पुरस्कार देण्यात आले.
अनिलकुमार लाहोटी, संबोधित करताना म्हणाले की, सुरक्षित काम करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये २४ तास सतर्कता त्यांना प्रेरित करेल आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तत्परतेने काम करतील.
यावेळी अतिरिक्त महाव्यवस्थापक बी. के. दादाभोय आणि प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी आलोक सिंह आणि मध्य रेल्वेचे विभाग प्रमुख, इतर प्रमुख उपस्थित होते. सर्व विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक या कार्यक्रमात सामील झाले.