विमानाच्या इंधनापेक्षा पेट्रोल महाग, कसे परवडणार वाहन चालवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST2021-07-31T04:17:06+5:302021-07-31T04:17:06+5:30
आकाश नेवे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात सध्या पेट्रोलचे दर हे १०८ रुपयांवर जाऊन पोहचले आहेत. तर नजिकच ...

विमानाच्या इंधनापेक्षा पेट्रोल महाग, कसे परवडणार वाहन चालवणे
आकाश नेवे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात सध्या पेट्रोलचे दर हे १०८ रुपयांवर जाऊन पोहचले आहेत. तर नजिकच औरंगाबाद विमानतळावर एटीएफ म्हणजेच ॲव्हिएशन टर्बाईन फ्युएल याचा दर फक्त ६० रुपये प्रतिलीटर आहे. त्यामुळे विमानाच्या इंधनापेक्षा दुचाकीचे इंधन महाग झाले आहे. या सततच्या वाढत्या इंधन दराने वाहन चालवणे कसे परवडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जळगाव शहरात सध्या एकुण २२ पेट्रोल पंप कार्यरत आहेत. त्यातून प्रत्येक पंपावरून दिवसाला सरासरी दोन ते अडीच हजार लीटर पेट्रोल विक्री होते. त्यासोबतच आता बहुतेक गाड्यांचा ॲव्हरेज देखील ४० ते ४५ च्या आसपास आला आहे. त्यामुळे अनेकांना वाहन चालवणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे. पेट्रोलचे दर १०८ रुपयांवर गेले असल्याने वाहन चालवणे अनेकांना परवडत नाही. पेट्रोलचे दर वाढत असले तरी सध्या विमानात लागणारे इंधन एटीएफचे दर मात्र कमी आहेत. जळगाव विमानतळावर विमानात इंधन भरण्याची व्यवस्था नाही. मात्र शेजारचा जिल्हा औरंगाबाद विमानतळावर ही व्यवस्था आहे. तेथे एटीएफचा दर हा ६० रुपये प्रतिलिटर आहे.
कोरोनामुळे खर्चात भर, पाचशेचे लागतात हजार
सध्या कोरोनाच्या काळात खर्चात भर पडली आहे. अनेकांचे पगार आधीच कमी झाले आहेत. अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. अजूनही निर्बंध लागु असल्याने अनेकांना काम मिळत नाही. अशा परिस्थितीत जेथे महिन्याला पाचशे रुपयांचे पेट्रोल पुरत होते. तिथे आता एक हजार रुपयेदेखील पेट्रोलला अपुर्ण पडत आहेत.
उत्पन्न कमी, खर्चात वाढ
कोरोनाच्या काळात उत्पन्नात घट होत आहेत. निर्बंधदेखील कायम आहेत. चारही बाजुंनी आर्थिक कोंडी होत आहे. त्यातच सातत्याने महागाई वाढत आहे. पेट्रोलचे दर असेच वाढत राहिले तर वाहन चालवणे परवडणार नाही. - सचिन पवार
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोलचे दर वाढत आहे. अशीच भाववाढ होत राहिली तर एक दिवस वाहन वापरणे बंद करावे लागणार आहे. या आधी महिन्यात पेट्रोलचा खर्च एक हजार रुपयेच होता. आता दीड ते दोन हजार रुपये पेट्रोलला लागत आहेत, सरकारने पेट्रोलचे दर नियंत्रणात आणावे. - पराग पाटील
शहरातील पेट्रोल पंपांची संख्या २२
दररोज लागणारे पेट्रोल -७० हजार लीटर
वाहनांची संख्या - ५५६७३
चारचाकी - ३७४८
दुचाकी - ४७१०६
बघा किती फरक
एटीएफ विमानातील इंधन दर ६० रुपये
पेट्रोल १०८ रुपये प्रति लीटर