चोपडा शहरात ४० सार्वजनिक मंडळांकडून गणपती विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST2021-09-15T04:20:59+5:302021-09-15T04:20:59+5:30
चोपडा : गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोना व्हायरस संसर्गाने शेकडो वर्षांची सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीची परंपरा खंडित झाली आहे. ...

चोपडा शहरात ४० सार्वजनिक मंडळांकडून गणपती विसर्जन
चोपडा : गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोना व्हायरस संसर्गाने शेकडो वर्षांची सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीची परंपरा खंडित झाली आहे. प्रादुर्भाव टाळण्यासाठी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने कार्यकर्त्यांच्या जल्लोषाशिवाय ४० सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन तापी नदीच्या पात्रात मंगळवारी करण्यात आले.
येथे पाचव्या दिवशी गणेश विसर्जन होते. गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे चोपडा शहराचे नाव अति संवेदनशील शहर म्हणून ओळखण्यात येते. अशा शहरात शेकडो वर्षांनंतर बिना वाजंत्री व जल्लोषाशिवाय बाप्पाचे विसर्जन झाले. ही सर्वांत विशेष बाब ठरली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत विसर्जन आटोपले होते.
पालिकेने ठेवले होते दहा ट्रॅक्टर
नगरपालिका प्रशासनाकडून दहा ट्रॅक्टरमध्ये सजावट केली होती. त्या ट्रॅक्टरवर सार्वजनिक मित्र मंडळाच्या व परिसरातील घरगुती मित्र मंडळाच्या आदी गणेशमूर्ती संकलित करून नगरपालिकेचे २० कर्मचारी यासाठी नियुक्त केलेले होते. पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक मित्र मंडळाचे प्रमुख पदाधिकारी यांनी सार्वजनिक मित्र मंडळाच्या गणेश स्थापनेच्या ठिकाणी हे ट्रॅक्टर नेऊन ठेवले होते. या ट्रॅक्टरवर आणि बहुतांश मंडळांनी स्वतः तीन चाकी प्रवासी रिक्षामध्ये गणपतीमूर्ती नेहमीच्या मिरवणुकीच्या मार्गाने नेत विसर्जन केले. वाजंत्र्यांशिवाय आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषाशिवाय प्रथमच ही मिरवणूक पार पडल्याचे चित्र दिसून आले.
न.पा. कर्मचाऱ्यांनी घेतले परिश्रम
शहरातील सार्वजनिक मित्र मंडळाचे व खाजगी घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नगरपालिकेतील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान, चोपडा शहरातील नेहमीचा गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग गोल मंदिर, मेन रोड, बोहरा गल्ली, आझाद चौक, पाटील दरवाजा, बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी चौक आणि तापी नदीकडे या पद्धतीने मार्ग होता. या मार्गावर बोहरा गल्लीमध्ये व आझाद चौकात विसर्जन मिरवणुकीला बाधा येऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून बॅरिकेटस् लावले होते. मिरवणूक शांततेने पार पडावी यासाठी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, चाळीसगाव येथील अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे हे चोपडा शहरात सोमवार रात्रीपासून ठाण मांडून बसलेले होते. त्यांच्या मार्गदर्शनाने साहाय्यक पोलीस अधीक्षक राकेश जाधव, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, साहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे, पोलीस कॉन्स्टेबल नीलेश सोनवणे, संतोष पारधी, शेषराव तोरे, प्रदीप राजपूत, प्रकाश मथुरे, मिलिंद सपकाळे आदींनी बंदोबस्त चोख ठेवला. बंदोबस्तासाठी मुंबई येथून रॅपिड ॲक्शन फोर्सच्या ८० जवानांची एक तुकडी व सोबत कंपनी कमांडंट बंदोबस्ताच्या ठिकाणी सजग होते.
तापी नदीवर क्रेन ठरली शोपीस
तापी नदीला पूर असल्याने निमगव्हान सावखेडादरम्यान तापी नदीवर असलेल्या पुलावरून गणपती मूर्ती क्रेनद्वारा थेट पाण्यात सोडण्यासाठी भली मोठी क्रेन नगरपालिकेतर्फे पुलाजवळ आणलेली होती. मात्र एकही मूर्ती क्रेनद्वारा पात्रात न सोडता थेट पुलावरूनच गणपती मूर्ती पाण्यात टाकून विसर्जन करण्यात आले. त्यामुळे नगरपालिकेने क्रेन आणून ठेवण्यापेक्षा इतर व्यवस्था केली नाही म्हणून गणपती मंडळ कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यात मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे यांचाही समावेश आहे.