जळगाव : मोरया गणपती बाप्पा मोरया.., आले..रे..आले.. बाप्पा..आले... मोरया.. या सारख्या एक ना अनेक गगनभेदी घोषणा देत विघ्नहर्त्या गणरायाचे गुरुवारी जळगाव शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. सकाळी ११ वाजेपर्यंत अनेक घरगुती गणपतींची स्थापना करण्यात आली तर मंडळांच्या मिरवणुकींना सुरुवात झाली. अनेक जण मुहूूर्त पाहून स्थापना करणार आहे तर संध्याकाळपर्यंत मंडळाच्या गणरायाची स्थापना होणार असल्याचे चित्र आहे. ढोल ताशांचा गजर, लेझीम पथकांचे ठेके लक्षवेधी ठरत आहे.सकाळी बाजारपेठेत गणेश मूर्ती व इतर साहित्य खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. आकर्षक वेशभूषा परिधान करून अबालवृद्ध व महिला वर्गही बाजारात गणेशाची मूर्ती खरेदी करण्यास आले असल्याचे विविध भागात दिसून आले.टॉवर चौक ते चौबे शाळेपर्यंत गणेश भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. सकाळी ९ वाजेपासून या ठिकाणी पाय ठेवायलादेखील जागा नव्हती. त्यामुळे मूर्ती घेण्यासाठी आलेल्या भाविकांनी आपली वाहने टॉवर चौक परिसर, नाथ प्लाझा, फुले मार्केट समोरील रस्त्यावर उभी केली होती. यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहनधारकांना वाहने हटविण्याचा सूचना दिल्या.अशीच परिस्थिती अजिंठा चौकात आणि बहिणाबाई उद्यान ते आकाशवाणी चौक परिसरात होती. ठिकठिकाणी बॅरिकेटस् लावण्यात आले होते.ग्रामीण भागातूनही गर्दीगणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील गणेश मंडळाचे कार्यकर्तेही जळगावात सकाळीच दाखल झाले होते. जळगाव तालुक्यातील आव्हाणे, कानळदा, भोकर, शिरसोली, नशिराबाद, आसोदा, भादली, ममुराबाद या गावांसह भुसावळ, चोपडा, एरंडोल, धरणगाव या तालुक्यांमधील काही गणेश मंडळाचे पदाधिकारीदेखील शहरात मूर्ती घेण्यासाठी आले होते.भाविकांची मांदियाळीटॉवर चौकासह शहरातील काही प्रमुख चौकांमध्येदेखील गणेश मूर्ती घेण्यासाठी गणेश भक्तांची मांदियाळी पहायला मिळाली. अजिंठा चौकात सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
Ganesh Chaturthi 2018 : जळगावात लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 11:15 IST
खरेदीसाठी प्रचंड गर्दी
Ganesh Chaturthi 2018 : जळगावात लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत
ठळक मुद्देढोल ताशांच्या पथकात मिरवणुकाग्रामीण भागातूनही खरेदीसाठी झाली गर्दी