एकाच वेळी दोघं मित्रांची अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 01:06 PM2020-08-11T13:06:30+5:302020-08-11T13:06:37+5:30

अग्निशमन दलाची मदत : २४ तासानंतर सापडले धबधब्यातील कुंडातील मृतदेह

Funeral of two friends at the same time | एकाच वेळी दोघं मित्रांची अंत्ययात्रा

एकाच वेळी दोघं मित्रांची अंत्ययात्रा

Next

जळगाव : बनोटी, ता. सोयगाव येथील धारकुंड धबधब्याच्या तलावात बुडालेल्या राहूल रमेश चौधरी (२३, रा.हनुमान नगर) व राकेश रमेश भालेराव (२५, रा. पंढरपूर नगर) या दोघांचा मृतदेह तब्बल २४ तासानंतर सोमवारी सायंकाळी सापडले. शवविच्छेदन झाल्यानंतर दोघांचे मृतदेह जळगावात आणण्यात आले. त्यानंतर काही वेळातच एकाच वेळी दोन्ही मित्रांची अंत्ययात्रा काढण्यात आली. रात्री साडेदहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेले जळगावातील राहूल व राकेश हे दोघं जण तर जारगाव, ता.पाचोरा येथील गणेश भिकन सोनवणे (२३) असे तिघं जण रविवारी दुपारी साडे चार वाजता बनोटी, ता. सोयगाव येथील धारकुंड धबधब्याच्या तलावात बुडाले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. पाऊस व रात्रीची वेळ असल्याने शोध कार्य थांबविण्यात आले होते. सोमवारी सकाळी स्थानिक मच्छीमार तसेच पोहण्यात तरबेज असलेल्या रामदास जाधव, आत्माराम सोनवणे व इतरांनी शोध मोहीम राबविली. त्यात राकेश व गणेश यांचे मृतदेह दुपारी चार वाजता हाती लागले. राहूल चौधरी याचा मृतदेह सापडत नसल्याने औरंगाबाद येथून अग्निशमन दलाचे पथक पाचारण करण्यात आले होते. या पथकाने दोन तास मेहनत घेतल्यानंतर सायंकाळी सहा वाजता त्याचा मृतदेह हाती लागला. त्यानंतर तिंघाचे मृतदेह बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केद्रात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण कदम यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर रात्री आठ वाजता तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

अश्रु आवरणे झाले कठीण
गणेश याच्यावर पाचोरा तर राहूल व राकेश या दोघांवर रात्री उशिरा जळगावातील मेहरुणमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांची अंत्ययात्रा सोबतच काढण्यात आल्याने मित्र व नातेवाईकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. दरम्यान, या घटनेत सोयगाव महसूल प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्ती घोषीत करण्यात आली असून तशी नोंद घेऊन अहवाल जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.

Web Title: Funeral of two friends at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.