नर्मदा व तापीच्या पाण्याचा पुरेपूर वापर : मुख्यमंत्री
By Admin | Updated: October 24, 2015 00:26 IST2015-10-24T00:26:18+5:302015-10-24T00:26:18+5:30
नंदुरबार : नर्मदा आणि तापी नदीच्या पाण्याचा वापर करून जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली

नर्मदा व तापीच्या पाण्याचा पुरेपूर वापर : मुख्यमंत्री
नंदुरबार : नर्मदा आणि तापी नदीच्या पाण्याचा योग्य आणि पुरेपूर वापर करून येत्या काळात जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन असल्याची माहिती देऊन जलयुक्त शिवारातील कामे दुष्काळ निवारणासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले. जिल्ह्यातील जलयुक्त शिवार कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवार, 23 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्नही गंभीर असल्याने जिल्ह्यातील रिक्त पदांवर चर्चा झाली. ही पदे लवकरच भरण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. इतर प्रश्नांबाबत आपण नोव्हेंबर महिन्यात पुन्हा जिल्हा दौ:यावर येणार असून त्या वेळी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. आढावा बैठकीतही जलयुक्त शिवार अभियान कामांचा आढावा घेण्यात आला. पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ.हीना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार जयकुमार रावल, आमदार शिरीष चौधरी, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी प्रदीप पी., मुख्य कार्यकारी अधिकारी राधाकृष्ण गमे आदी उपस्थित होते. धुळे कॉँग्रेस जिल्हाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडविली शिरपूर : कापसाला 7 हजार रुपये भाव द्यावा या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना शिरपूर विमानतळावर देण्यास आडकाठी झाल्याने धुळे जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी नंदुरबारकडे जाणारा मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा ताफा अडवून महामार्गावर त्यांना निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांच्या वतीने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी हे निवेदन स्वीकारले. शिरपूर सहकारी साखर कारखाना (शिसाका) सुरू करण्यासंदर्भात तालुका भाजपातर्फे, तर कापसाला भाव द्या या मागणीसाठी काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले. शिरपूर तालुका प्रभारी डॉ़ जितेंद्र ठाकूर यांच्यासह जिल्हाध्यक्ष बबन चौधरी व सहका:यांनी निवेदन दिल़े