जळगावात यारी, दोस्तीने गजबजले कट्टे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 22:08 IST2017-08-06T22:07:00+5:302017-08-06T22:08:38+5:30
वर्षभर रिकामे पडलेले कट्टे रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ निमित्त गजबजले होते.

जळगावात यारी, दोस्तीने गजबजले कट्टे
आॅनलाईन लोकमत,
जळगाव-दि.६,
वर्षभर रिकामे पडलेले कट्टे रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ निमित्त गजबजले होते. शहरातील गल्ली-बोळात मित्र-मैत्रीणी एकमेकांना शुभेच्छा देत होते. सोशल नेटवर्किंग साईट्सवर तर शुभेच्छांचा अक्षरश: पाऊस पडत होता. भेटवस्तू खरेदी करण्यासाठी तरुणाईची ‘गिफ्ट हाऊस’ मध्ये गर्दी पहायला मिळाली.
महाविद्यालयासमोर असलेले चहाचे स्टॉल, कॉलनी-गल्लीमधील ओट्यांवर तरुण-तरुणींची एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती. एकमेकांना फ्रेंडशिप डे बेल्ट बांधून हा दिवस साजरा केला.
निसर्गरम्य ठिकाणावर साजरा केला फ्रेंडशिप डे
शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्याने अनेकांनी जिल्ह्यातील मनुदेवी, पद्मालय, पाटणादेवी, उनपदेव अशा निसर्र्गरम्य ठिकाणी जावून फ्रेंडशिप डे साजरा केला. तसेच अनेकांनी एकमेकांच्या घरी जावून फ्रेंडशिपच्या शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयांमधील हॉस्टेल वर देखील फ्रेंडशिप डेचा उत्साह पहायला मिळाला. धावपळ व कामाच्या व्यापात अनेकदा जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होत नाही. मात्र रविवारी शहरातील अनेक जुन्या मित्रांनी वेळ काढून एकत्र भेटण्याची योजना आखल्याचे दिसून आले. महाविद्यालयीन काळाच्या आठवणींना उजाळा देखील देण्यात आला.
लीड इंडियातर्फे अनोख्या पध्दतीने ‘फ्रेंडशिप डे’ साजरा
लीड इंडिया तर्फे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व सुरक्षा रक्षकांना फ्रेंडशिप बेल्ट बांधून हा दिवस साजरा करण्यात आला. तर अनेक महाविद्यालयीन युवक-युवतींनी वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत फ्रेंडशिप डे साजरा केला.