दारूबंदीसाठी मतदानाचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: November 24, 2015 00:52 IST2015-11-24T00:52:48+5:302015-11-24T00:52:48+5:30
निरनिराळ्या अडथळ्यांमुळे वांध्यात पडलेल्या दारूबंदी आंदोलनास पुन्हा ऊर्जा मिळाली आहे.

दारूबंदीसाठी मतदानाचा मार्ग मोकळा
कु:हाकाकोडा, ता.मुक्ताईनगर : निरनिराळ्या अडथळ्यांमुळे वांध्यात पडलेल्या दारूबंदी आंदोलनास पुन्हा ऊर्जा मिळाली आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कु:हा येथे दारूबंदी करण्यासाठी मतदान प्रक्रिया राबविण्याचे पत्र दिल्यामुळे मतदान प्रक्रियेला वेग आला आहे. 29 नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने दारूबंदीसाठी महिलांनी कंबर कसली आहे. वॉर्डावॉर्डात प्रचार रॅली व कॉर्नर बैठक सुरू झाल्याने बाटली आडवी होईल की नाही? या उत्सुकतेमुळे पंचक्रोशीतील सर्व गावांचे लक्ष या मतदानाकडे लागले आहे. दारूबंदी, व्यसनमुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या तथा पं.स.च्या उपसभापती प्रमिला राठोड व माजी सरपंच भागवत राठोड यांच्या प्रयत्नामुळे कु:हा येथील महिलांनी 25 जानेवारीच्या महिला ग्रामसभेत संपूर्ण दारूमुक्तीचा ठराव पास केला होता. त्यानिमित्त मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कच्या अधिका:यांनी कु:हा येथील महिलांच्या स्वाक्ष:यासुद्धा घेतल्या. मात्र तेव्हापासून दारूबंदीच्या आंदोलनास निरनिराळ्या अडथळ्यांचे ग्रहण लागले. या प्रक्रियेविरुद्ध देशी दारू दुकान व बारमालकांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे काही काळापुरती दारूबंदीची मोहीम स्थगित झाली. मात्र आंदोलनाच्या कार्यकत्र्यानी उच्च न्यायालयातही योग्य भूमिका मांडल्यामुळे औरंगाबाद खंडपीठाकडून कु:हा येथे दारूबंदीसाठी मतदान घेण्याकरिता प्रक्रिया राबविण्याचे पत्र मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयास प्राप्त झाले. त्यानुसार तहसीलदारांनी कु:ह्याचे तलाठी व ग्रामसेवक यांना 29 रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेर्पयत मतदान घेण्यासंदर्भातील प्रक्रियेबाबत गावात प्रसिद्धी करण्याचे आदेश दिले. गावात दारूबंदी करण्यासाठी मतदान होणार असल्याने महिलांमध्ये उत्साह संचारला असून दारूबंदी, व्यसनमुक्ती आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा प्रमिला राठोड, जिल्हा संघटक भागवत राठोड व त्यांच्या कार्यकत्र्यानी संपूर्ण गावात जनजागृतीचा धडाका लावला आहे. वॉर्डावॉर्डातील रॅलीच्या माध्यमातून महिला मतदारांना दारूच्या व्यसनाचे दुष्परिणाम सांगून दारूबंदीसाठी मतदान करण्याकरिता प्रवृत्त करण्यात येत आहे. अवैध धंद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कु:हाकाकोडा येथे देशी-विदेशी दारूचा अक्षरश: महापूर आहे. घराघरात दारूचे दुष्परिणाम दिसत असल्याने महिलांनी दारूबंदीचा प्रण घेतल्याने आता दारू विक्रेत्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. दारूबंदीचा परिणाम परिसरातील गावांवर होणार असल्याने सर्वाच्याच नजरा आता याकडे लागलेल्या आहेत. (वार्ताहर)