बचत गटाच्या नावाने महिलांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:16 IST2021-03-25T04:16:57+5:302021-03-25T04:16:57+5:30
गुन्हा दाखल : सुभाषवाडी येथील महिलेची तक्रार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कागदपत्रांमध्ये फेरफार करून बचत गटाच्या नावाने परस्पर ...

बचत गटाच्या नावाने महिलांची फसवणूक
गुन्हा दाखल : सुभाषवाडी येथील महिलेची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कागदपत्रांमध्ये फेरफार करून बचत गटाच्या नावाने परस्पर ८० हजारांचे कर्ज काढून सुभाषवाडी (ता. जळगाव) येथील महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सुभाषवाडी येथील छायाबाई कैलास राठोड (वय २६) यांच्यासह ललिताबाई तुकाराम चव्हाण, अक्काबाई पंडित चव्हाण, गिरीजाबाई युवराज राठोड, गीताबाई रमेश राठोड, रुख्माबाई भंगलाल चव्हाण या महिलांना बचत गटातून प्रत्येकी २० हजार रुपये कर्ज काढून देण्यासाठी गावातच राहणाऱ्या नवल त्र्यंबक राठोड याने मदत केली. यासाठी राठोड याने एप्रिल २०१९मध्ये या सर्व महिलांचे आधारकार्ड, पासपोर्ट फाेटो अशी आवश्यक कागदपत्रं गोळा करुन गणेश कॉलनीतील एका बँकेत जमा केली. यात अक्काबाई व गिरीजाबाई या दोघींचेच कर्ज मंजूर झाले, तर इतरांचे कर्ज नामंजूर झाल्याचे नवील याने महिलांना सांगितले. अक्काबाई व गिरीजाबाई यांना प्रत्येकी २० हजार रुपये मिळाले. यानंतर अन्य महिला पाचोरा येथील फायनान्स कंपनीत बचत गटाचे कर्ज घेण्यास गेल्या. तेथेही त्यांनी कागदपत्रं सादर केली. यावेळी फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी भागवत बोराडे यांनी तपासणी केली असता, सर्व महिलांच्या नावे जळगावातील एका बँकेत प्रत्येकी १४ हजार ७०० रुपये थकीत कर्ज असल्याचे दिसून आले. त्यानुसार महिलांनी पुन्हा नवल राठोड याच्याकडे विचारणा केली. तसेच बँकेत जाऊन चौकशी केली. यावेळी संबधित महिलांच्या मूळ कागदपत्रांवरील फोटो व मोबाईल क्रमांक बदलून त्यांच्या नावावर प्रत्येकी २० हजार असे एकूण ८० हजार रुपयांचे कर्ज एप्रिल २०१९मध्येच घेतल्याचे समोर आले. या महिलांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित प्रकरण गाेपाळ कोळी (पूर्ण नाव माहीत नाही) याने केल्याचे निष्पन्न झाले. कोळी याने अक्काबाई व गिरीजाबाई यांचे कर्ज मंजूर करण्यासाठी प्रत्येकी ८०० रुपये कमिशन नवलकडून घेतले होते तर अन्य चार महिलांचे कर्ज प्रकरण नामंजूर झाल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र या चारही महिलांच्या नावे त्याने परस्पर कर्ज काढल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी छायाबाई राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार अधिक तपास करत आहेत.
----------