रस्ता लूट करणा-या चार चोरट्यांना एलसीबीने पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 21:24 IST2017-11-14T21:23:54+5:302017-11-14T21:24:54+5:30
एकाच दुचाकीवर चार जण बसून रस्त्यात वाहनधारकांना लुटणाºया भुसावळ येथील चौघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्यात एक जण अल्पवयीन आहे. या चौघांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. रिहान उर्फ छोटू हसेन पटेल (वय १९), शेख मोहसीन उर्फ बाटूक शेख सलीम (वय १८), सैय्यद अहमद (वय १८) व एक अल्पवयीन अशी आरोपींची नावे आहेत.

रस्ता लूट करणा-या चार चोरट्यांना एलसीबीने पकडले
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, १४: एकाच दुचाकीवर चार जण बसून रस्त्यात वाहनधारकांना लुटणा-या भुसावळ येथील चौघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्यात एक जण अल्पवयीन आहे. या चौघांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. रिहान उर्फ छोटू हसेन पटेल (वय १९), शेख मोहसीन उर्फ बाटूक शेख सलीम (वय १८), सैय्यद अहमद (वय १८) व एक अल्पवयीन अशी आरोपींची नावे आहेत.
स्वप्नील मोहन साळुंखे (रा.न्हावी, ता.यावल) हे १२ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वाजता दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.टी.६५७५) घरी जात असताना भोरटेक फाट्याजवळ या चौघांनी साळुंखे यांच्या दुचाकीच्या समोर त्यांची दुचाकी आडवी लावून साळुंखे यांना बाहेर ओढले. त्यानंतर मारहाण करुन हातातील सोन्याची अंगठी, एक हजार रुपये रोख, मोबाईल असा ३३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून स्वत: जवळील दुचाकी झुडपात फेकून साळुंखेच्या दुचाकीने पळ काढला होता. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असताना स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र पाटील यांना ही लूट भुसावळ येथील तरुणांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्याशी चर्चा केली. कुराडे यांनी पाटील यांच्या दिमतीला विजय पाटील, शशिकांत पाटील, संजय पाटील, सुरेश महाजन, शरीफ काझी, युनुस शेख, दीपक पाटील, विलास पाटील, नरेंद्र वारुळे, चालक दीपक पाटील व प्रवीण हिवराळे यांना दिले. या पथकाने मंगळवारी दिवसभर भुसावळ शहरात सापळा रचून चौघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना जळगाव येथे आणण्यात आले. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (क्र.यु.पी.७२ के. ८०३०) जप्त करण्यात आली आहे. ही दुचाकी देखील चोरीची असण्याची शक्यता सुनील कुराडे यांनी व्यक्त केली आहे. या चौघांविरुध्द पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.