Four policemen injured in stone pelting at Bhusawal | भुसावळ येथे दगडफीकीत चार पोलीस जखमी
भुसावळ येथे दगडफीकीत चार पोलीस जखमी

 भुसावळ: नागरीकत्व दुरुस्ती कायद्यास विरोध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे २९ ला पुकारलेल्या भारत बंद दरम्यान शहरात दोन ठिकाणी दगडफेक झाल्यामुळे या बंदला गालबोट लागले आहे. त्यामुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दगडफेकीत चार पोलीस आणि तीन नागरीक किरकोळ जखमी झाले.
शहरात सकाळी सुरवातीस बाजारपेठ बंद करण्यात आली होती. मात्र शनिमंदीर वार्डाकडून दुकाने बंद करण्यासाठी जमाव आला असता पोलिसांनी हा जमाव काझी प्लॉट जवळ अडविला. याप्रसंगी काही समाज कंटकांनी सुरु असलेल्या दुकानांवर दगडफेक केली. यावेळी चार पोलिस कर्मचाऱ्यासह छायाचित्रकार कमलेश चौधरी व काही नागरिकांना दगडफेकीची झळ पोहोचली. मात्र पोलिसांनी जमावाला परत फिरविण्यात यश आले. त्यानंतर हा जमाव राजा टॉवर चौकातून मॉडर्न रोडच्या दिशेने वळला. यावेळी जमावाने मॉडर्नरोडवरील हॉटेल आर्य निवासवर दगडफेक केली. यावेळी परिसरात चांगलीच धावपळ उडाली व अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. यामुळे शहरात भितीचे वातावरण व अफवांचे पेव पसरले होते. दगडफेकीच्या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शहरात भेट देऊन पहाणी केली.
रस्ता रोको चा प्रयत्न फसला
घटनेची माहिती मिळताच, डिवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार घटनास्थळी दाखल झाले. व जमावाला पांगविले. त्यानंतर जमाव पुन्हा राष्ट्रीय महामार्गावरील खडका चौफुलीवर जमा झाला. यावेळी जमावाने रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणुन पाडला. तर खडका चौफुलीवर दुपारी १ वाजेच्या सुमारास जमाव पुुन्हा जमा झाला. यावेळी बामसेफ संघटनेचे कार्यकर्ते प्रतिभा उबाळे, एम.एम. मन्सुरे, हमीद शेख आदींनी जमावाला मार्गदर्शन केले. जोपर्यंत कायदा रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल. मैदानावरची लढाई लढतच रहा असे आवाहन केले.

Web Title: Four policemen injured in stone pelting at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.