जळगाव : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात चार जण ठार झाले. यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. यातील एक नवविवाहित आहे. पहिला अपघात अभोडा ता. रावेरनजीक सोमवारी सायंकाळी ४ वाजता तर दुसरा अपघात वर्डी- माचला ता. चोपडानजीक सोमवारी सायंकाळी ४:३० वाजता झाला.रामदास प्रकाश बारेला (१९) आणि करण प्रकाश बारेला ( आठ वर्षे, रा. गुलाबवाडी ता. रावेर) हे सख्खे भाऊ अभोडानजीक तर मगन जगन बारेला (२५) व रगन जगन बारेला (१८, रा. वर्डी ता. चोपडा) अशी वर्डीनजीकच्या अपघातात ठार झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. रामदास बारेला याचे महिनाभरापूर्वीच लग्न झाले होते.रामदास व करण हे रसलपूर ता. रावेर येथे बहिणीला भेटण्यासाठी गेले होते. तिथून दुचाकीने परत येत असताना अभोडा गावानजीक त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली, त्यात दोघे जण ठार झाले. तर वर्डी-माचला फाट्यादरम्यान मगन आणि रगन बारेला यांच्या दुचाकीला चारचाकीने जोरदार धडक दिली. यात दोघे जण ठार झाले. या अपघातप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
जिल्ह्यात दोन अपघातात चार जण ठार, गुलाबवाडी आणि वर्डीतील दोन सख्ख्या भावांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 01:16 IST