चाळीसगावी अखेर ‘तो’ आला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:13 IST2021-06-18T04:13:14+5:302021-06-18T04:13:14+5:30
चाळीसगाव : आपल्या आगमनाचे नगारे वाजवत पाऊस पावलांनी ‘तो’ आला अन् जलधारांची आरास देऊनी गेला...बागायती कपाशीच्या ओंजळीत जीवदानाचे थेंबच ...

चाळीसगावी अखेर ‘तो’ आला!
चाळीसगाव : आपल्या आगमनाचे नगारे वाजवत पाऊस पावलांनी ‘तो’ आला अन् जलधारांची आरास देऊनी गेला...बागायती कपाशीच्या ओंजळीत जीवदानाचे थेंबच आभाळाने टाकले असून कोरडवाहू पेऱ्यासाठी अजूनही बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
चाळीसगाव परिसरात पावसाने गर्दी करीत तीन ते चार दिवस हजेरी लावली. हा पाऊस ७३ मि.मी. झाला. दि. ८ पासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला असला तरी खरिपाच्या पेरणीसाठी शेती-शिवारं सज्ज झाली असताना पावसाचे न येणे शेतकऱ्यांना कासावीस करून सोडत होते. गुरुवारी मात्र पावसाने आपल्या आगमनाची चाहूल दिली आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला.
चौकट
२० हजार हेक्टरवरील कपाशीला ‘उभारीची लस’
चाळीसगाव परिसरात दरवर्षी बागायती कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यावर्षीही अक्षयतृतीयेलाच शेतकऱ्यांनी एकूण २० हजार हेक्टर क्षेत्रावर बागायती कपाशीचा पेरा केला. एकूण ३४ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र लागवडीखाली येणार आहे. लागवड झाल्यानंतर पावसाने पाठ फिरवली. उन्हाचाही पार वाढला. यामुळे २० हजार हेक्टरवरील बागायती कपाशीच्या पेऱ्याला नख लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. तथापि, गुरुवारी झालेल्या पावसाने या लागवडीला ‘उभारीची लस’च दिली असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत होती.