माजी अप्पर पोलीस अधीक्षक मनोज लोहार खंडणीप्रकरणात दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 12:54 IST2019-01-17T12:54:02+5:302019-01-17T12:54:18+5:30
जिल्हा न्यायालयाचा निर्णय

माजी अप्पर पोलीस अधीक्षक मनोज लोहार खंडणीप्रकरणात दोषी
जळगाव : जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचे अपहरण करुन खंडणी मागितल्याप्रकरणी चाळीसगाव परिमंडळाचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार व धीरज यशवंत येवले या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी १६ रोजी दोषी ठरविले आहे. तसेच या प्रकरणातील तिसरे आरोपी चाळीसगावचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक विश्वासराव निंबाळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याप्रकरणी १९ रोजी सुनावणी होऊन शिक्षा ठोठावली जाणार आहे.
चाळीसगाव येथील रहिवासी व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ.उत्तमराव धनाजी महाजन यांचे अपहरण करून त्यांच्याकडून २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अप्पर पोलिस अधीक्षक मनोज लोहार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोज लोहार यांनी डॉ. महाजन यांचे अपहरण करून वेगवेगळ्या दोन ठिकाणी डांबून ठेवले होते. ही घटना ३० जून २००९ रोजी चाळीसगाव येथे घडली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात न्या. पी. वाय. लाडेकर यांच्या समोर सुनावाणी झाली. खटल्यात १६ साक्षीदारांची साक्ष अतिशय महत्वपूर्ण ठरली. याप्रकरणी बुधवारी कोर्टाने निकाल दिला.
वादग्रस्त कारकिर्द
दरम्यान, मनोज लोहार यांची जळगाव जिल्ह्यातील कारकिर्द वादग्रस्त ठरली होती. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याशीही त्यांचे खटकले होते. त्यावरून विधानसभेत खडसे यांनीही तक्रारी करून लोहार यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.