‘बीएचआर’च्या मालमत्ता माजीमंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्या नावावर खरेदी केल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:43 IST2020-12-04T04:43:47+5:302020-12-04T04:43:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जामनेर, जि. जळगाव : बीएचआर पतसंस्थेच्या जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील मालमत्ता माजी मंत्री गिरीश महाजन यांनी समर्थक ...

‘बीएचआर’च्या मालमत्ता माजीमंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्या नावावर खरेदी केल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर, जि. जळगाव : बीएचआर पतसंस्थेच्या जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील मालमत्ता माजी मंत्री गिरीश महाजन यांनी समर्थक व कार्यकर्त्यांच्या नावावर खरेदी केल्या, असा आरोप जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी बुधवारी निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
ललवाणी यांची सोमवारी पुणे पोलिसांनी चौकशी केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, आपल्याकडे असलेली या प्रकरणाशी संबंधित माहिती गुन्हे आर्थिक शाखेला देण्यासाठी पुणे गेलो होतो; मात्र राजकीय विरोधकांनी अफवा पसरविली. माझ्यावर गुन्हे दाखल करणाऱ्यावर यापुढील काळात खरे गुन्हे दाखल करून त्यांना सळो की पळो करून सोडेन, असेही त्यांनी सांगितले.
पतसंस्थेच्या ज्या ठेवीदारांना आत्महत्या कराव्या लागल्या, त्याला हेच जबाबदार असून, त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी आपली मागणी आहे. सुनील झवर याच्याशी आपला संबंध नसल्याचे ते सांगत असले तरी त्यांच्या नावावर पुणे येथे घेतलेली मालमत्ता यांचीच आहे. जामनेर शहरातील पतसंस्थेच्या काही मालमत्तांवर दोघांची (गिरीश महाजन व साधना महाजन) नावे लागली आहे, तशी सात-बारा उताऱ्यात नोंद असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोट्यवधींच्या मालमत्ता मातीमोल भावाने पावत्यांच्या माध्यमातून खरेदी करून नैतिकतेचा आव त्यांनी आणू नये, वेळ पडल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत मागेपुढे पाहणार नाही, असे ललवाणी यांनी सांगितले.