शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखांचा पालिकेतील सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:11 IST2021-07-02T04:11:55+5:302021-07-02T04:11:55+5:30
शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा शहरप्रमुख अभिजित पाटील यांनी सकाळी सोशल मीडियात टाकलेल्या पोस्टमुळे धरणगाव शहराच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा ...

शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखांचा पालिकेतील सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर
शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा शहरप्रमुख अभिजित पाटील यांनी सकाळी सोशल मीडियात टाकलेल्या पोस्टमुळे धरणगाव शहराच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली. थोड्याच वेळात ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल व्हायला लागली.
अभिजित पाटील यांची पोस्ट जशीच्या तशी !
आमच्या समस्या : मातोश्रीनगरातील ओपन स्पेस ही दुसऱ्या व्यक्तीला वापरावयास द्यावयाचा बेकायदेशीर ठराव नगरपालिकेने करावयाचा. त्याच्याविरुद्ध परिसरातील नागरिकांनी संघर्ष करायचा की ती जागा आमच्या मुलांना खेळण्यासाठी आहे, ती राहू द्या. तेव्हा तत्कालीन मुख्याधिकारी यांनी त्यावर ही जागा नियमानुसार देता येत नाही, असा शेरा मारला व तेव्हा तो विषय थांबला आणि असे हे दोन वेळा घडले.
आमच्या नगरातील लोकांनी सुविधा मिळण्यासाठी मागणी केली तर काॅलनीतील कुणालाही विचारात न घेता सरळ पेव्हर ब्लाॅकने रस्त्यांची कामे होत आहेत.
पेव्हर ब्लॉक हे रस्ते करण्यासाठी असतात, की साइडपट्ट्या, चौक करण्यासाठी असतात, काँक्रीटच्या रोडपेक्षा वाहने घसरण्याचे प्रमाण हे पेव्हर ब्लाॅकवर जास्त असते हे कोणताही प्रामाणिक इंजिनिअर जो आपल्या कामाशी प्रामाणिक आहे, तो सांगू शकेल.
अरे बाबांनो, विकासकामे करताना गावाच्या समस्यांची प्रायोरिटी काय, लोकांची मागणी काय, हे तर विचारात घ्या. बहुमत जनतेने दिले आहे ते जनतेला विचारात घेऊन काम करण्यासाठी, जनतेवर लादण्यासाठी नव्हे.
-अभिजित पाटील,
माजी शिवसेना शहरप्रमुख व माजी नगरसेवक, धरणगाव