वनविभागाने राजुरा येथे वनदावेदारांच्या शेतातील उभी पिके फेकली उपटून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:18 IST2021-09-18T04:18:10+5:302021-09-18T04:18:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुक्ताईनगरमधील राजुरा गावात वनदावेदारांच्या शेतातील उभी पिके मारहाण करत उपटून फेकली व खोट्या ...

वनविभागाने राजुरा येथे वनदावेदारांच्या शेतातील उभी पिके फेकली उपटून
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मुक्ताईनगरमधील राजुरा गावात वनदावेदारांच्या शेतातील उभी पिके मारहाण करत उपटून फेकली व खोट्या केसेस केल्या, असा दावा लोकसंघर्ष मोर्चाने केला आहे. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे व आपद्ग्रस्तांनी शुक्रवारी जळगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन व्यथा मांडली.
वनक्षेत्रात पिढ्यान्पिढ्या कसत असलेल्या जमिनींवर त्यांचे दावे नियमित करण्यासाठी संसदेने १६ सप्टेंबर २००६ रोजी आदिवासी व वननिवासी यांच्यावर शतकानुशतके अन्याय झाला आहे तो दूर करण्यासाठी वनहक्क कायदा पारित केला. या कायद्यांतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा गावातील १४ शेतकऱ्यांनी आपले दावे दाखल केले आहेत. मात्र वनविभागाने वनपरिक्षेत्र वदोडा यांचे कार्यालय कुऱ्हा काकोडा येथील वनकर्मचाऱ्यांनी या शेतकऱ्यांना धमक्या देत त्यांच्या शेतात बेकायदेशीर घुसत शेतात तिसऱ्यांदा पेरलेले उभे पीक उपटून नष्ट केले व त्यांच्यावर उलट शेतात घुसूनही ३५३ कलमाखाली केसेस दाखल केल्या.
वनविभागाच्या या अन्यायाविरोधात लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात उपटलेली पिके घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. यावेळी प्रतिभा शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर या शेतकऱ्यांची बाजू मांडत या वनकर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची व ज्या दावेदारांचे दावे अद्याप प्रलंबित आहेत त्यांच्या शेतात वनविभागाने कुठलीही आगळीक करू नये अन्यथा आम्हाला कोरोनाकाळातही तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वनविभागावर नाराजी व्यक्त करत उपविभागीय वनहक्क तपासणी समितीमार्फत या शेतात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याबाबत व संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे.
अन्यथा मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने
प्रतिभा शिंदे यांनी, जर वनविभागाने वनदावेदारांना विनाकारण त्रास देणे थांबवले नाही तर आम्हाला पुन्हा कोरोनाचा विचार न करता मुंबई गाठत मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने करावी लागतील, असे सांगितले.
वनविभागाचे अधिकारी म्हणतात...
वनविभागाची बाजू जाणून घेतली असता वडोदा वनक्षेत्राचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. थोरात यांनी सांगितले की, वनपरिक्षेत्र हद्दीत राजुराच नव्हे तर अन्य कोणत्याही ठिकाणी वनकर्मचाऱ्यांनी पीक उपटून फेकण्याची घटना घडलेली नाही व तशा प्रकारचा कोणताही वनगुन्हा दाखल झालेला नाही. वनदाव्यासाठी स्वतःहून गुन्हे दाखल करून घेण्यासाठी हा बनाव आहे. उलटअर्थी वनकर्मचाऱ्यांच्या वनगस्तीदरम्यान काही लोकांकडून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.