चारा सडल्याने दूध उत्पादनही घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:27 IST2019-11-05T21:26:59+5:302019-11-05T21:27:05+5:30
अमळनेर तालुक्यातील स्थिती : पिकांचे पंचनामे सुरू, शेतकऱ्यांवर पशुधन विकण्याची वेळ

चारा सडल्याने दूध उत्पादनही घटले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. जनावरांना गवत आणि चारा सडल्याने खायला काहीच नसल्याने दूध उत्पादनावर परिणाम झालेला दिसून येत आहे.
गेली चार वर्षे कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे जगणे मुश्कील केले, तर यंदा ओल्या दुष्काळाने होत्याचे नव्हते झाले आहे. ज्वारी, कापूस, मका अशा सर्वच प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाळ््यानंतर गवत उगवल्याने आणि ज्वारी, बाजरी, मक्याची ताटे जनावरांना चारा म्हणून उपलब्ध होतो. मात्र यंदा भरमसाट प्रमाणात पाऊस पडल्याने चारा, गवत सडल्याने जनावरे खात नाहीत. परिणामी हिरवा चारा नसल्याने गाई-म्हशींचे दूध देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार चारा नसल्याने बैल व इतर जनावरे विक्रीला येत आहेत.
आमदार वाघ यांनी जिल्हा कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, तहसीलदार यांना सर्वच ठिकाणी पंचनामे करुन आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या. नंदगाव शिवारात प्रांताधिकारी सीमा आहिरे यांनी पाहणी केली. तलाठी पराग पाटील यांनी पंचनामे केले. त्यावेळी नायब तहसीलदार आर.एस.चौधरी, तलाठी पराग पाटील, उपसरपंच नंदगाव सदाशिव बडगुजर, नितीन पाटील, गणेश पाटील, अरुण पाटील, किशोर पाटील, शिवानंद पाटील उपस्थित होते.
चाऱ्याचा प्रश्न गंभीर
तालुक्यातील सुमारे १ लाख १० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यात ४३ हजार शेतकºयांनी आतापर्यंत अर्ज भरले आहेत. काही ठिकाणी शेतांमधील पाण्याचा निचरा झाला आहे. मात्र गवतही पाण्याखाली हाहिल्यान व मका, ज्वारी पिके सडल्याने सध्या तालुकाभरात पशुधनासाठी चाºयाचा प्रश्न गंभीर आहे, तालुका कृषी अधिकारी भारत वारे यांनी सांगितले.