पाचशे, दोन हजारच्या नोटांचा उडतोय रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:27 IST2021-03-04T04:27:40+5:302021-03-04T04:27:40+5:30
जळगाव : चलनी नोटा खराब झाल्यानंतर त्या बदलून देण्यासाठी बँकांमध्ये सुविधा आहे. मात्र आता खराब नोटांसोबत काही नोटांचा रंगही ...

पाचशे, दोन हजारच्या नोटांचा उडतोय रंग
जळगाव : चलनी नोटा खराब झाल्यानंतर त्या बदलून देण्यासाठी बँकांमध्ये सुविधा आहे. मात्र आता खराब नोटांसोबत काही नोटांचा रंगही उडत असल्याने त्यादेखील बदल करण्यासाठी या नोटा बँकांमध्ये जमा केल्या जात आहे. यात पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण अधिक आहे. बँकांकडून ग्राहकांना नोटा लगेच बदलून दिल्या जात असल्या तरी बँकांकडून त्या रिझर्व्ह बँकेकडे पाठविल्यानंतर नवीन नोटा येण्यास अधिक वेळ लागत असल्याचे चित्र आहे.
पाचशे आणि दोन हजाराच्या नोटा
१) तसे पाहता कोणतीही नोट कितीही खराब झाली तरी बदलून दिली पाहिजे, असे आयबीआयचे धोरण आहे. यासाठी क्लीन नोट पॉलिसीच असून त्यानुसार ग्राहकांना त्याचा लाभ दिला जातो.
२) आता नोटा खराब होण्यासोबतच त्यांचा रंगही उडत असल्याच्या तक्रारी आहे. यात अधिक प्रमाण ५०० व दोन हजारांच्या नोटांचे आहे. या नोटा बँकांमध्ये जमा केल्यानंतर ग्राहकांना त्या बदलून मिळतात.
नोटा बदलून येण्यास लागतो वेळ
- बँकांकडे ज्या नोटा जमा होतात, त्या बदलून मिळण्यासाठी ‘करंसी चेस्ट’ (खराब नोटा एकत्रित करून त्या रिझर्व्ह बँकेला पाठविणे) ज्या बँकेत असेल तेथे पाठविल्या जातात.
- जळगावात स्टेट बँक ऑफ इंडियाकडे करंसी चेस्ट आहे. तर बँक ऑफ महाराष्ट्र औरंगाबाद, नाशिक येथे तर बँक ऑफ इंडिया नाशिक येथे खराब नोटा करंसी चेस्टकडे पाठवित असतात.
- करंसी चेस्टकडे खराब, रंग उडालेल्या नोटा जमा झाल्यानंतर त्या एकत्रित करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पाठविल्या जातात.
- एक किंवा दोन अशा सुट्या नोटा पाठविता येत नसल्याने त्यांचे पाकीट तयार होईपर्यंत किमान १०० नोटांची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे अगोदरच वेळ जातो. त्यात आरबीआयकडे नोटा गेल्यानंतर त्या नष्ट करून नवीन नोटा येण्याच्या प्रक्रियेतही अधिक वेळ जातो.
————————-
नोटा कितीही खराब झाल्या तरी त्या बँकांकडून बदलून दिल्या जातात. आता नोटांचा रंग उडाल्याची तक्रार असली तरी त्या बदलून मिळतात. शिवाय ज्या नोटांना बाहेरचा रंग लागलेला असतो, त्यादेखील बदलून मिळतात. यासाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत नाही.
- अरुण प्रकाश, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक
आरबीआयच्या धोरणानुसार ग्राहकांना नोटा बदलून दिल्या जातात. यात कोणाची अडवणूक होत नाही. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे धोरणच असून त्यानुसार हे कामकाज चालते.
- मोहन खेवलकर, जिल्हा उपाध्यक्ष, ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लाॅईज असोसिएशन.