भरधाव कार थेट मेहरूण तलावात
By Admin | Updated: October 5, 2015 01:04 IST2015-10-05T01:04:50+5:302015-10-05T01:04:50+5:30
जळगाव : भरधाव वेगाने जाणारी कार वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट मेहरूण तलावात गेली.

भरधाव कार थेट मेहरूण तलावात
जळगाव : भरधाव वेगाने जाणारी कार वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट मेहरूण तलावात गेली. त्यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले, तर कारमधील अन्य दोन जण व तलावाकाठी शौचास बसलेला एक जण बचावले. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली. जखमी झालेल्या यश कैलास मंधवानी (वय 20, रा.गायत्रीनगर) व पंकज सुभाष हेमवानी (वय 19, रा.सिंधी कॉलनी) यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 7 वाजता क्रेनने काढली कार संध्याकाळी सात वाजता क्रेन मागवून कार तलावातून बाहेर काढण्यात आली. दरम्यान, एमआयडीसीचे उपनिरीक्षक जगदीश देवरे यांनी घटनास्थळास भेट दिली. कार धुण्यासाठी गेले तलावावर यश कैलास मंधवानी, पंकज सुभाष हेमवानी, दिनेश सतीश मेघानी (वय 19, रा.गणपतीनगर) व सनी कटारिया (वय 21, रा.गणपतीनगर) हे चौघं जण रविवारी संध्याकाळी कार (क्रमांक एम.एच.19,7073) ने फिरायला व कार धुण्यासाठी मेहरूण तलावावर गेले होते. सेंट टेरेसाकडून खाली तलावाकडे आल्यानंतर पुढे श्रीकृष्ण लॉन्सच्या रस्त्याने प्रचंड वेगाने जात असताना कारचालकाने एका दुचाकीस्वाराला ओव्हरटेक केले. त्यानंतर पुढे वळणावर ब्रेक मारल्याने गाडी पलटी होऊन थेट तलावात गेली. उंच टेकडी असल्याने कारने तीन पलटी घेतल्या. त्यामुळे यश याचा पाय स्टेअरिंगमध्ये अडकला, तर पंकज याच्याही डोक्याला मार लागला. या प्रकारामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांची धावपळ सुरू झाली होती रिक्षाचालकाने काढले बाहेर कार पलटी होऊन पाण्यात गेल्याने शेजारीच रिक्षा धुण्यासाठी काही तरुण आले होते तसेच फिरायला आलेल्या तरुणांनी चौघांना कारच्या बाहेर काढले. यश व पंकजला मार लागल्याने दोघांना तातडीने रिक्षात टाकून खासगी रुग्णालयात नेण्यात आले. दिनेश व सनीला सुदैवाने कुठलीही इजा झाली नाही.