अर्जांचा ओघ घटला; आयटीआय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST2021-08-22T04:19:14+5:302021-08-22T04:19:14+5:30
सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : खासगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस विद्यार्थ्यांकडून यंदा ...

अर्जांचा ओघ घटला; आयटीआय
सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : खासगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस विद्यार्थ्यांकडून यंदा कमी प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदत देण्यात आली आहे. याशिवाय, आता संस्थांमधील प्रवेश शंभर टक्के होतील यादृष्टीने खासगी व शासकीय आयटीआय 'प्रवेश प्रोत्साहन अभियान' राबविणार आहे.
आयटीआय प्रवेश प्रक्रिया ही १ ऑगस्टपासून सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण ३० शासकीय व खासगी आयटीआय आहेत. या आयटीआयमधील जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मागील वर्षी १६ हजार ५१३ विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज निश्चित केले होते. मात्र, यंदा १० हजार ३७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १० हजार ७५ विद्यार्थ्यांनी अर्जांची पुष्टी केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत राज्यातील खासगी व शासकीय आयटीआयमधील प्रवेशासाठी अर्जांचा ओघ घटलेला असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे संस्थांमधील प्रवेश शंभर टक्के होतील, या दृष्टीने 'प्रवेश प्रोत्साहन अभियान' राबविण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे.
काय असणार अभियानात...
आयटीआय प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी विभागामार्फत प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आयटीआय संस्थेत दररोज समुपदेशन सत्र आयोजित करण्याच्या सूचना केल्या आहेत़ दुर्गम व ग्रामीण भागात प्रवेशाबाबत माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रसार माध्यमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेशाची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच ज्या भागातून कमी अर्ज प्राप्त झाले आहेत, त्या भागात प्रवेश अर्ज भरण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.
- जिल्ह्यातील आयटीआय महाविद्यालय : ३० (सुमारे)
- आतापर्यंत नोंदणी केलेले विद्यार्थी : १०,३७९
- अर्जांची पुष्टी केलेले विद्यार्थी : १०,०७५