महापूर ओसरला, आता पंचनाम्याची घाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST2021-09-02T04:36:51+5:302021-09-02T04:36:51+5:30
कजगाव, ता. भडगाव : तितूर नदीच्या महापुरामुळे कजगाव, भोरटेक, उमरखेड व पासर्डी येथील साडेचारशे ते पाचशे एकर शेती क्षेत्रातील ...

महापूर ओसरला, आता पंचनाम्याची घाई
कजगाव, ता. भडगाव : तितूर नदीच्या महापुरामुळे कजगाव, भोरटेक, उमरखेड व पासर्डी येथील साडेचारशे ते पाचशे एकर शेती क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानीचा प्राथमिक अंदाज शासनस्तरावर कळविण्यात आला असून, आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, डॉ. विशाल पाटील, प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार मुकेश हिवाळे व तालुक्यातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. आमदार पाटील यांनी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, तहसीलदार हिवाळे यांनीही महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, चार गावात चार तलाठी व चार कृषी सहायक यांची नियुक्ती करत दोन दिवसांत म्हणजेच दि. २ पर्यंत पंचनामे सादर करण्याचे आदेश दिले असल्याने पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.
दि. ३१ रोजी तितूर नदीस महापूर आला. यात करोडो रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले. अनेक घरांत पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी सारे साहित्य, घरसामान ओले झाल्याने खराब झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले.
४५० ते ५०० एकर क्षेत्रातील पीक जमीनदोस्त
महापुरात भडगाव तालुक्यातील उमरखेड शिवारात ४८ हेक्टर कपाशी, ४ हेक्टर केळी, ८ हेक्टर मका अशा ६० हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भोरटेक बु. येथील शिवारात ४९ हेक्टर कपाशी, ७ हेक्टर मका, ४ हेक्टर सोयाबीन, ५ हेक्टर इतर पीक याप्रमाणे ६५ हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाले आहे.
कजगाव शिवारात २० हेक्टर कपाशी, २ हेक्टर मका, ३ हेक्टर फळपीक, २ हेक्टर इतर पिकांचे नुकसान झाले आहे. पासर्डी शिवारात १२ हेक्टर कपाशी, ४ हेक्टर इतर पिकांचे नुकसान झाले आहे. एकंदरीत चार खेड्यांत अंदाजे साडेचारशे ते पाचशे एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याच प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याने पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
कजगाव-नागद या मार्गाचा संपर्क तुटल्याने या मार्गावर तूर्त कच्चा भराव करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे बंद पडलेली वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पाचोरा येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी करत तूर्त कच्चा रस्ता बनविण्यासाठीचे आदेश कर्मचाऱ्यांना दिल्याने तत्काळ काम हाती घेण्यात आले.
शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
तितूर काठावर असलेल्या जमिनीवरील पीक या महापुराने गिळंकृत केले. हातातोंडाशी आलेला घास या पुराने हिरावल्यामुळे बळीराजाचे सारे आर्थिक गणित कोलमडले आहे. यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडणार आहे. चारच खेड्यांत या महापुरामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
केटीवेयरचा भराव वाहून गेला
पंधरा वर्षांपूर्वी बनविलेल्या केटीवेयरमुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला होता. मात्र, बनलेल्या केटीवेयरच्या पिचिंगचे काम अर्धवट होते. याबाबत अनेक वेळा वृत्त प्रकाशित करण्यात आले. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. शेवटी महापुरात या केटीवेयरचा भराव वाहून गेल्याने गळती लागली आहे. या खात्याचे अधिकारी येऊन पाहणी करून गेले. आता या केटीवेयरच्या दुरुस्तीकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागणार आहे. दुरुस्ती न केल्यास या केटीवेयरमध्ये पाणी थांबणार नाही.
010921\01jal_3_01092021_12.jpg~010921\01jal_4_01092021_12.jpg~010921\01jal_5_01092021_12.jpg
कजगाव नागद खचलेल्या मार्गावर भराव करताना.केटीवेयरचा भराव तुटल्याने वाहणारे पाणी. कजगाव नागद मार्गावरील भराव वाहून गेल्याने अडचणीतून मार्ग काढताना नागरीक.~कजगाव नागद खचलेल्या मार्गावर भराव करताना.केटीवेयरचा भराव तुटल्याने वाहणारे पाणी. कजगाव नागद मार्गावरील भराव वाहून गेल्याने अडचणीतून मार्ग काढताना नागरीक.~कजगाव नागद खचलेल्या मार्गावर भराव करताना.केटीवेयरचा भराव तुटल्याने वाहणारे पाणी. कजगाव नागद मार्गावरील भराव वाहून गेल्याने अडचणीतून मार्ग काढताना नागरीक.