पूरग्रस्तांची तहसील कचेरीत धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST2021-09-03T04:17:39+5:302021-09-03T04:17:39+5:30
चाळीसगाव : दोन दिवसांपासून अन्न पाणी व मूलभूत सुविधांपासून उपेक्षित असलेल्या चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांनी गुरुवारी दुपारी चाळीसगाव तहसील ...

पूरग्रस्तांची तहसील कचेरीत धडक
चाळीसगाव : दोन दिवसांपासून अन्न पाणी व मूलभूत सुविधांपासून उपेक्षित असलेल्या चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांनी गुरुवारी दुपारी चाळीसगाव तहसील कचेरीत धडक मारली. यात सुमारे दोनशे ते तीनशे महिला पुरुष आणि लहान बालकांचा समावेश होता. सर्व पूरग्रस्त लोकांनी यावेळी आपली कैफियत मांडली. समता सैनिक दल व एकलव्य संघटनेच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला होता.
समता सैनिक दलाचे नाना बागुल, एकलव्य संघटनेचे पवनराजे सोनवणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. समता सैनिक दलाचे भाईदास गोलाईत, स्वप्नील जाधव, दीपक बागुल, नितीन मरसाळे, लाला आप्पा परदेशी, सुरेश गायकवाड, एकलव्य संघटनेचे सुधाकर वाघ, पिंटू गायकवाड, नाना सोनवणे आदी कार्यकर्त्यांनी यावेळी पूरग्रस्तांच्या अडचणी तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे मांडल्या. तहसीलदार मोरे यांनी म्हणणे ऐकून घेतले.
आज पूरग्रस्तांना दोन वेळ जेवण आणि पिण्याचे पाणी शासनाने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. लवकरच अशी सुविधा शासनाकडून देण्यात येईल, अशी ग्वाही तहसीलदारांनी दिली.
आता तातडीची मदत कशी करता येईल यावर निर्णय घेत नाना बागुल यांनी वर्धमान धाडीवल यांना अधिकाऱ्यांच्या समक्ष फोन लावून उपस्थित पूरग्रस्तांना जेवण व पाणी पुरवावी, अशी विनंती केली. त्यानुसार थोड्याच वेळात सर्व लोकांना जेवणाची पाकिटे व पाणी वर्धमान मित्रमंडळ यांचेकडून उपलब्ध करण्यात आले.
तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे हस्ते तहसील कचेरीच्या आवारात जेवण वाटप करण्यात आले. पूरग्रस्तांनी तहसील आवारात पंगत मांडून जेवण घेतले. जवळपास तीनशे लोकांची व्यवस्था यावेळी करण्यात आली.
याचवेळी पोलीस खात्यातील माणूस जागा झाला आणि पोलीस कर्मचारी पंढरी पवार आणि सहकाऱ्यांनी नूतन पोलीस निरीक्षक पाटील यांच्या वतीनेदेखील बिस्कीट पुडे आणि पाण्याच्या बाटल्या उपस्थित जणांना वाटून माणुसकीचे प्रदर्शन घडविले. याप्रसंगी वर्धमान धाडीवाल व इतर उपस्थित होते. गुरुवारी सायंकाळी शासनाची मदत तुमच्या घरापर्यंत पोहचली नाही तर उद्या संध्याकाळी तहसील कचेरीत सर्व पूरग्रस्त मुक्कामाला येतील, अशी भूमिका घेऊन आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले.
फोटो ओळी :
चाळीसगाव तहसील कार्यालय आवारात पूरग्रस्तांनी मागण्यासाठी आंदोलन करून कैफियत मांडली. छाया-संजय सोनार, चाळीसगाव