महापुराने ६०० दुकानदारांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:18 IST2021-09-03T04:18:57+5:302021-09-03T04:18:57+5:30
चाळीसगाव : मंगळवारी आलेला पूर ओसरल्यानंतर गत दोन दिवसांपासून शिवाजी घाटावरील दुकानदार आणि घरांचे नुकसान झालेले आहे. नागरिक ...

महापुराने ६०० दुकानदारांचे नुकसान
चाळीसगाव : मंगळवारी आलेला पूर ओसरल्यानंतर गत दोन दिवसांपासून शिवाजी घाटावरील दुकानदार आणि घरांचे नुकसान झालेले आहे. नागरिक सावरण्याचा प्रयत्न करीत असून, गुरुवारी काही दुकानदारांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. पुराच्या तडाख्यातून सावरलेले चाळीसगाव हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
दरम्यान, गुरुवारी पुराच्या पाण्यात भिजलेल्या वस्तू घेण्यासाठी महिलांची मोठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. चाळीसगाव शहरात तितूर नदीपात्रालगत असणाऱ्या दुकानांमध्ये पुराचे पाणी १५ ते २० फुटांपर्यंत शिरले होते. हा संपूर्ण परिसर जलमय झाला होता. डोंगरी व तितूर नदीचा संगम या दुकानांपासून अवघ्या हजार पावलांवर होत असल्याने याच परिसरात पुराच्या प्रवाहाने मोठी धडक दिली होती. यामुळेच पुराचे पाणी तहसील कार्यालयाच्या वीर सावरकर चौकात, तर घाट रोडवरील डॉ. पूर्णपात्रे रुग्णालयापर्यंत पोहोचले होते.
६०० दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. स्टील भांडी, किराणा सामान, रेडिमेड कपडे, साडी, मसाले, खाद्यपदार्थ, चपला - बुट, फळांची दुकाने, फर्निचर, आदी दुकानांचा यात समावेश आहे. बुधवारी आणि गुरुवारी देखील दुकानदारांनी पुराच्या पाण्यात वाहून आलेली घाण, गाळ यांची स्वच्छता केली. अजूनही शिवाजी घाट परिसरात गाळ साचलेला आहे.
.............
चौकट
भिजलेल्या वस्तू, कपडे, भांडी घेण्यासाठी गर्दी
पुराच्या पाण्यात भिजलेल्या वस्तू मिळेल त्या किमतीत विकण्याशिवाय या दुकानदारांकडे दुसरा पर्याय नसल्याने तयार कपडे, किराणा सामान, भांडी, साड्या घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. यात महिला वर्गाची संख्या सर्वाधिक होती.
............. चौकट
दुकाने सावरण्यासाठी आठ ते दहा दिवस लागणार
शिवाजी घाटावरील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून, दुकानदारांना पुराच्या तडाख्यातून सावरण्यासाठी अजून आठ ते दहा दिवसांचा कालावधी आहे.
1...डोळ्यात अश्रू असताना पूरग्रस्त नागरिक, दुकानदार या तडाख्यातून आता स्वतःला सावरत आहे.
2...पंचनामे झाल्याने तातडीने शासनाने मदतीचा हात पुढे करावा. पंचनाम्यांचा नुसता फार्स नको, अशा प्रतिक्रिया दुकानदार व नागरिकांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केल्या.
3...किराणा सामान, मसाले व खाद्यपदार्थ पुराच्या पाण्यात भिजल्याने परिसरात दुर्गंधीही पसरली आहे.