दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांना धरणगावला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2023 17:17 IST2023-09-11T17:17:15+5:302023-09-11T17:17:18+5:30
धरणगाव पोलिसांचे पथक पाळधी ते सावदा प्रचा शिवारात रविवारी रात्री गस्त घालत होते.

दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांना धरणगावला अटक
भगीरथ माळी
धरणगाव (जि. जळगाव) : दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या पाच दरोडेखोरांना धरणगाव पोलिसांनी अटक केली. पाळधी ते सावदा प्रचा, ता. धरणगाव शिवारात रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून चारचाकी वाहन, लोखंडी सळई असे साहित्य जप्त करण्यात आले. हे सर्व जण बडवानी(मध्य प्रदेश) येथील आहेत.
अनिल लासग भिल (२१), नानूसिंग रूपसिंग बारेला (२५), जानमन रुमालसिंग बारेला (२२), भाईदास पातलिया भिलाला (२९) आणि हत्तर गनदा चव्हाण (भिलाला) (२२), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. धरणगाव पोलिसांचे पथक पाळधी ते सावदा प्रचा शिवारात रविवारी रात्री गस्त घालत होते. त्याचवेळी सप्तश्रृंगी मातेच्या मंदिराजवळ एक चारचाकी उभी असलेली आढळली. त्यात पाच तरुणही होते. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे चाकू, मिरची पावडर आदी साहित्य आढळून आले. पोलिसांनी लागलीच त्यांना पकडले. याबाबत धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सचिन शिरसाठ करीत आहेत.