पहिल्यांदा फुलले कमळ..!

By Admin | Updated: October 20, 2014 09:56 IST2014-10-20T09:56:13+5:302014-10-20T09:56:13+5:30

गेल्या ३५ वर्षांत ९ वेळा जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून सलगपणे निवडून येत असलेल्या सुरेशदादा जैन यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांनी हरतर्‍हेचे प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते.

First flower lily ..! | पहिल्यांदा फुलले कमळ..!

पहिल्यांदा फुलले कमळ..!

जळगाव शहर विधानसभा निवडणूक २0१४

गेल्या ३५ वर्षांत ९ वेळा जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून सलगपणे निवडून येत असलेल्या सुरेशदादा जैन यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांनी हरतर्‍हेचे प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते. १९८0 ला काँग्रेस (आय)कडून सुरेशदादांनी पहिल्यांदा निवडणूक लढविली. त्यात काँग्रेस एसचे तुकाराम चौधरी यांना पराभूत करीत ते आमदार म्हणून निवडूनही आले. त्यानंतर १९८५ व १९९0 मध्ये रमेश चौधरी व ईश्‍वरलाल जैन या काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत केले. १९९५ मध्ये काँग्रेस(आय) कडून निवडणूक लढवित अपक्ष डॉ.अर्जुन भंगाळे यांना पराभूत केले. १९९६ व १९९९ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवित काँग्रेस (आय)चे रवींद्र पाटील व डॉ.अर्जुन भंगाळे यांना पराभूत केले. २00२ व २00४ मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवित शिवसेनेचे प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा पराभव केला. तर २00९ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवित अपक्ष मनोज चौधरी यांचा पराभव केला. यापैकी केवळ १९८0 ला भाजपाचे गजानन जोशी हे उमेदवार होते. त्या वेळी त्यांना केवळ ९३८0 मते मिळाली होती. नंतर युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला हा मतदारसंघ असल्याने एकाही निवडणुकीत भाजपाचा उमेदवार नव्हता. त्यामुळे दर निवडणुकीत दादांच्या बाजूने पडणारे व्यापारिवर्गाचे मतदान यंदा विभागले गेले. त्यातच जळगाव शहर मतदारसंघ हा संपूर्ण शहराचा म्हणजेच मनपा क्षेत्रातील भाग आहे. मनपावरही सातत्याने आमदार सुरेशदादांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीची सत्ता राहिली आहे. त्यामुळे विरोधकांनी दादांच्या वर्चस्वाला छेद देण्यासाठी मनपाची कोंडी करण्याचा मार्ग अवलंबिला. घरकूल प्रकरणात सुरेशदादांना अडकविल्याने ते गेल्या अडीच वर्षांपासून शहराच्या, मतदारांच्या संपर्कात नव्हते. या कालावधीत मनपाची राज्य शासनाने जितकी आर्थिक कोंडी करता येणे शक्य होते, तितकी कोंडी केली. हुडको कर्ज फेडीसाठी गाळे करारासंदर्भात केलेले ठराव सातत्याने विखंडित करण्यात आले. त्यामुळे मनपाचा कर्जफेडीचा पर्याय खुंटला. विकासकामांचे प्रस्तावही राज्य स्तरावरच अडविले गेले. त्यात हुडकोकडून दबाव आणून मनपाची बँक खाती ऐन निवडणुकीच्या तोंडावर ५0 दिवस सील करण्यात आली. त्यामुळे मनपा कर्मचार्‍यांनीही संप पुकारला. परिणामी शहरातील रस्ते दुरुस्तीत झालेला अडथळा, घाणीचे साम्राज्य यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण व्हावा व तो दादांच्या विरोधात मतपेटीत उतरावा यासाठी सोयीस्करपणे प्रयत्न झाले. दादा स्वत: उपस्थित असते तर चित्र वेगळे राहिले असते. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत विरोधकांची ही खेळी यशस्वी झाली व शहरात पहिल्यांदा कमळ फुलले आहे. 

Web Title: First flower lily ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.