Fire in garage at yaval | यावल येथे गॅरेजला आग
यावल येथे गॅरेजला आग

ठळक मुद्देचार चाकी तीन वाहने जळून खाक११ लाखो रुपयांचे नुकसानगॅरेजच्या शेडसोबतच आतील साहित्यही जळाले

यावल, जि.जळगाव : येथील भुसावळ रस्त्याला लागून असलेल्या एका गॅरेजला मध्यरात्रीनंतर अचानक आग लागली. यात दुरूस्तीसाठी लावण्यात आलेली चारचाकी तीन वाहने जळून खाक झाली. या घटनेत वाहनधारकांसह गॅरेज मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.
यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर योगेश रमेश नेमाडे यांचे दुचाकी व चार चाकी वाहन दुरुस्ती करण्याचे गॅरेज आहे. बुधवारी पहाटेपूर्वी या गॅरेजला अचानक आग लागली. यात दुरुस्तीसाठी लावण्यात आलेली चार चाकी तीन वाहने जळून खाक झाली.
नईम छोटू पटेल (रा.विरार नगर, यावल) यांच्या मालकीची सात लाख रुपये किमतीची जीप (क्रमांक एमएच-१९-बीयु-५५७), नरेंद्र कोळी मनवेल यांची दोन लाख रुपये किमतीची कार (क्रमांक एमएच-४३-एन-१४५५) व दहिगाव येथील एका ग्राहकाची दोन लाख रुपये किमतीची कार (क्रमांक एमएच-०५-एबी-०३७०) ही वाहने दुरूस्ती करीता आलेली होती. ११ लाख रुपये किमतीची ही तीन वाहने होती. याशिवाय गॅरेजचे शेड आणि त्यातील साहित्यदेखील या आगीमध्ये जळून नष्ट झाले आहे.
गॅरेजमध्ये दुरुस्तीकरिता लावलेली वाहने आगीत खाक झाल्यामुळे गॅरेजचालकास ग्राहकांकडून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या घटनेचा पंचनामा तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी एस. व्ही. सूर्यवंशी यांनी केला. याबाबत यावल पोलिसातदेखील आगीची तक्रार देण्यात आलेली आहे.


Web Title: Fire in garage at yaval
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.