कुठल्याही वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST2021-08-22T04:19:40+5:302021-08-22T04:19:40+5:30
तातडीने डॉक्टरांना दाखविणे आवश्यक : तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, निदानासाठी नमुने संकलन डमी १०७५ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गोवर ...

कुठल्याही वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर?
तातडीने डॉक्टरांना दाखविणे आवश्यक : तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, निदानासाठी नमुने संकलन
डमी १०७५
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गोवर आणि रुबेला हा आजार आता लहान मुलांपर्यंत मर्यादित राहिलेला नसून तो मोठ्यांनाही होत असल्याचे आढळून येत आहे. अशा परिस्थितीत कुठल्याही वयोगटातील ताप व अंगावरील पुरळ याला गोवर संशयित म्हणून संबोधले जाते. अशा स्थितीत रुग्णांनी खासगी किंवा शासकीय यंत्रणेत तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
जिल्हाभरात सध्या व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यात डेंग्यू, मलेरियाने डोके वर काढले आहे. त्यात अंगावर पुरळ येणे व ताप असे रुग्णही काही प्रमाणात आढळून येत आहेत. अशा स्थितीत नागरिकांनी आजार अंगावर न काढता योग्य उपचार घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
असे केले जाते निदान
ताप व अंगावर पुरळ आलेले रुग्ण शासकीय यंत्रणेत दाखल झाल्यानंतर या रुग्णाचे नमुने घेतले जातात. खासगी यंत्रणेत असे काही रुग्ण आहेत का? याची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली जाते. या रुग्णांचे हे संकलित केलेले नमुने एनआयव्ही पुणे येथे पाठवून त्यानंतर याचे निदान केले जाते.
गोवर, रुबेलाचे १०० टक्के लसीकरण
२०१८ साली जिल्हाभरात गोवर -रुबेला लसीकरणासाठी एक विशेष मोहीम जिल्हा आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेली होती. या मोहिमेंतर्गत लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली.
या मोहिमेंतर्गत १५ वर्षांपर्यंतच्या शंभर टक्के लाभार्थ्यांचे गोवर -रुबेला लसीकरणासाठी एमआर लसीकरण झाले होते,अशी माहिती माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी दिली.
..तर डॉक्टरांना दाखवा
गोवर हा मोठ्यांमध्येही होऊ शकतो. तो कुठल्याही वयोगटात होऊ शकतो. अशा स्थितीत ताप असणे व अंगावर पुरळ येणे हे गोवरचे लक्षण आहे. त्यामुळे अशा स्थितीत खासगी किंवा शासकीय डॉक्टरांना दाखवून योग्य उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. वाघ यांनी केले आहे.
-------------
२०१८ मध्ये आपण शंभर टक्के लाभार्थ्यांचे गोवर- रुबेला लसीकरण करून घेतले आहे. यासाठी आपण जिल्हाभरात एक विशेष मोहीम राबविली होती. गोवर हा कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला होणारा आजार आहे. अंगावर पुरळ येणे, ताप येणे अशा व्यक्तींचे रक्त नमुने घेऊन ते एनआयव्हीला पाठविले जातात. - डॉ. समाधान वाघ, माता व बालसंगोपन अधिकारी