संरक्षित विमा रक्कम न मिळाल्याने शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST2021-07-11T04:12:13+5:302021-07-11T04:12:13+5:30
यावल : तालुक्यातील शेतकऱ्यांना फळपीक विम्याचे पैसे न मिळाल्याने अनेक शेतकरी नुकसानीचा फटका बसल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना ...

संरक्षित विमा रक्कम न मिळाल्याने शेतकरी हवालदिल
यावल : तालुक्यातील शेतकऱ्यांना फळपीक विम्याचे पैसे न मिळाल्याने अनेक शेतकरी नुकसानीचा फटका बसल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना तत्काळ हे विम्याचे पैसे मिळावेत अशा मागणीचे निवेदन जि. प. चे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना दिले आहे. शेजारच्या रावेर तालुक्यात हे पैसे मिळाले असताना यावल तालुक्यातच विलंब का, असा सवालही उपस्थित होत आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, यावल तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळ पीक विमा योजना सन २०१९-२०२० मध्ये रबी (अंबिया बहार) केळी या पिकावर घेतलेली होती. जून २०२० मध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. याचा विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीला (एसीआय) प्रपत्र -०२ भरून माहिती सादर केलेली होती. त्यानुसार सदर कंपनीचे प्रतिनिधी हे नुकसानग्रस्त भागांचे प्रचंनामे करून गेलेले आहेत, यानुसार काही शेतकऱ्यांना वादळाचे पैसे खात्यात आले. मात्र, अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. याबाबत विमा कंपनीकडे पाठपुरावा केला असता पुढील महिन्यात जमा होतील असे सांगूनदेखील जूनमध्ये पैसे आले नाहीत. आता जुलै उजाडला तरीही पैसे जमा झालेले नाहीत.
अन्यथा जि. प. सभापती उपोषण करणार
संबंधित कंपनीकडे याबाबत विचारणा केली असता उडवा-उडवीची उत्तरे मिळत असल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. संबंधित शेतकरी वर्गाची वादळी वाऱ्याची अडकलेली रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यात यावा अन्यथा सर्व शेतकऱ्यांसमवेत उपोषणाला बसण्याचा इशारा सभापती रवींद्र पाटील यांनी दिला आहे.