युरियासाठी शेतकऱ्यांची भटकंती थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST2021-07-14T04:20:25+5:302021-07-14T04:20:25+5:30

हरताळा, ता. मुक्ताईनगर : यंदा खरिपाच्या पेरण्या लांबल्या असून काही शेतकऱ्यांनी सिंचनावर्ती कापूस लागवड केली. मात्र येथे युरियाची ...

Farmers will not stop wandering for urea | युरियासाठी शेतकऱ्यांची भटकंती थांबेना

युरियासाठी शेतकऱ्यांची भटकंती थांबेना

हरताळा, ता. मुक्ताईनगर : यंदा खरिपाच्या पेरण्या लांबल्या असून काही शेतकऱ्यांनी सिंचनावर्ती कापूस लागवड केली. मात्र येथे युरियाची टंचाई भासत असून युरियासाठी शेतकर्‍यांना वणवण भटकावे लागत आहे. येथे विकास सोसायटीचे रासायनिक खतांचे दुकान आहे. मात्र गावातील विकास सोसायटी युरिया, १०-२६-२६ इत्यादी कापूस पिकाला लागणारी रासायनिक खते उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे.

अर्धा जुलै महिना आला तरी खते मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सध्या महिन्यानंतर पावसाळी वातावरण असल्याने पिकांची वाढ वेळेवर व्हावी, तसेच कीटकांपासून, प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे, पीक वाढीसाठी उपयुक्त युरियाचा डोस पिकांना देणे गरजेचे आहे. गेल्यावर्षीदेखील असाच खतांचा तुटवडा असताना शेतकऱ्यांनी लांबून इतर नातेवाईकांशी संपर्क करून खते बोलून घेतली. काही ठिकाणी खतांचा साठवडा तर होत नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे.

पाऊस नसला तरी बागायती कापसाला, पिकांना खताची मात्रा आवश्यक असतानाच खताची टंचाई भासत आहे. विशेषत: शेतकऱ्यांकडून युरियाची मोठ्या प्रमाणात मागणी होत असताना, तोच मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खतांची गरज भासत असताना वेळ निघून गेल्यावर काय फायदा? अशी भावना शेतकऱ्यांतून उमटत आहे.

शेतकऱ्यांना मागणीनुसार खताचा पुरवठा करणे अपेक्षित आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन त्वरित खते उपलब्ध करून द्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांकडे युरियासह सर्व खतांची मागणी केली आहे. शासनामार्फतच सर्व संबंधित सोसायट्यांना खत पुरवठा केला जाणार आहे. चढ्या भावाने विक्री न करता ठरवून दिल्याप्रमाणे विक्री होत आहे. एक-दोन दिवसात खत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. शासन दराबरोबरच लवकरच खते उपलब्ध होतील.

- ईश्वर रहाणे, चेअरमन, विविध कार्यकारी सोसायटी, हरताळा. ता. मुक्ताईनगर

Web Title: Farmers will not stop wandering for urea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.