कापूस प्रश्नावर शेतकर्यांची एकजूट
By Admin | Updated: December 1, 2014 14:32 IST2014-12-01T14:32:10+5:302014-12-01T14:32:10+5:30
कापसाच्याभावाबाबत चिंतेत असलेल्या उत्पादक शेतकर्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत कापसावर बोला, असा आवाज घुमविला.

कापूस प्रश्नावर शेतकर्यांची एकजूट
मुक्ताईनगर : कापसाच्याभावाबाबत चिंतेत असलेल्या उत्पादक शेतकर्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत कापसावर बोला, असा आवाज घुमविला. मुख्यमंत्री क्षणभर थांबले आणि होय त्यावरच बोलतो, असे उद्गार काढत कापसाच्या हमी भावावर बोनस देण्याचा विचार असल्याची भूमिका जाहीर केली.
खान्देशातील एखाद्या सभेत चक्क मुख्यमंत्र्यांना शेतमालाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचा कदाचित हा पहिलाच प्रसंग असावा. असे असले तरी पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे खान्देशातील शेतकरीही शेतमालाच्या भावाबाबत एकवटू शकतात ही बाब प्रामुख्याने समोर आली. निमित्त होते येथील संत मुक्ताई शुगर अँण्ड एनर्जी साखर कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ व १२मेगावॅट सहवीजनिर्मिती प्रकल्प भूमिपूजनाचे.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणामुळे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हा व खान्देशातील मागण्या मांडल्या व मुख्यमंत्र्यांनी सभेत याबाबत घोषणा करावी, जेणेकरून याची इतिहासात नोंद होईल, असे आवाहन केले. मुक्ताईनगर येथे शेतीशास्त्र व तंत्रनिकेतन महाविद्यालय, शहादा-नंदुरबार परिसरातील सिंचन प्रकल्प, चाळीसगाव-भुसावळ औद्योगिक वसाहत आणि उद्योगाबाबतच्या मागण्या पूर्णत्वास अनुकूलता दर्शवत अन्य मागण्यांवर मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात समोर असलेल्या शेतकर्यांच्या कापसाबाबतची भूमिका जाहीर व्हावी याबाबत संयमाचा बांध सुटला आणि भरसभेत कापसावर बोला, असा आवाज सभामंडपात घुमला.मुख्यमंत्र्यांनी चार सेकंद आपले भाषण थांबविले.होय..त्यावरच बोलतोय, अशी सुरुवात केली आणि कापसाच्या हमी भावावर बोनस देण्याचे जाहीर केले.
घाईघाईत सत्कार..
■ आमदारांच्या सत्काराच्या वेळी तो लवकर व्हावा म्हणून धावपळ झाली.आमदार महाजन, अशोक कांडेलकर, उदय वाघ यांनी आमदारांचे पटापट सत्कार आटोपले.
■ आमदार उन्मेष पाटील या एकमेव आमदारास येथे भाषणाची संधी मिळाली. उन्मेष पाटील यांनी बेलगंगा, सिंचन प्रकल्प, औद्योगिक वसाहत-पाठोपाठ शेतकर्यांच्या मनातील कापसाच्या भावाबाबतच्या प्रश्नाला वाचा फोडली.