बेपत्ता शेतकऱ्याच्या नावावर बोगस शेतकरी उभा करून विकली शेतजमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST2021-06-21T04:13:35+5:302021-06-21T04:13:35+5:30
ओझरखेड सरपंच पती व वरणगावच्या माजी नगरसेवकाच्या भावासह इतरांनी केली फसवणूक बोगस आधारने बखळ जागेत राहणारा निराधार झाला एका ...

बेपत्ता शेतकऱ्याच्या नावावर बोगस शेतकरी उभा करून विकली शेतजमीन
ओझरखेड सरपंच पती व वरणगावच्या माजी नगरसेवकाच्या भावासह इतरांनी केली फसवणूक
बोगस आधारने बखळ जागेत राहणारा निराधार झाला एका रात्रीत शेतकरी
बोदवड : बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याच्या नावावर बोगस शेतकरी उभा करून शेतजमीन विकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ओझरखेड सरपंच पती व वरणगावच्या माजी नगरसेवकाच्या भावासह इतरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोदवड व वरणगाव येथील सर्व प्रकारच्या खरेदी विक्रीचे नोंदणीकृत व्यवहार बोदवड येथील उपनिबंधक कार्यालयामार्फत नोंदणीकृत होत असतात.
असाच २८ डिसेंबर २०२० रोजी बोदवड येथील साहाय्यक उपनिबंधक खरेदी विक्री कार्यालयात बोगस शेतकरी दाखवून शेतजमीन परस्पर विकून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील लक्ष्मण कौतिक पाटील यांची गट क्रमांक १०२ मध्ये तीन हेक्टर २७ आर शेतजमीन आहे. ही जमीन त्यांनी तोंडी करारावर कसण्यासाठी काहूरखेडा येथील बापूराव पवार यांना दिली आहे. त्यानंतर गत ४० वर्षांपासून लक्ष्मण पाटील हे बेपत्ता आहेत.
ही शेतजमीन तेव्हापासून बापूराव पवार हे कसत असताना त्यांच्याकडून वयोमनाने होत नसल्याने व त्यांच्या निधनानंतर त्यांना मूलबाळ नसल्याने सालीचा मुलगा असलेला वसंता तुकाराम भिल (सेवानिवृत्त कर्मचारी तापी पाटबंधारे) यांच्याकडे सोपवली होती. वसंता भिल यांचा मुलगा हा बोदवड तालुक्यातील वरखेड बुद्रूक येथील राहणार असल्याने ते कधी मुलाकडे येऊन राहत होते. त्यामुळे शेतीकडे फारसे लक्ष राहत नसे. त्याचा फायदा ओझरखेड येथील सरपंच पती असलेले तसेच वरणगाव येथील नगरसेवकाचे भाऊ असलेले संशयित विकास नरसिंग पाटील रा.ओझरखेड, ता. भुसावळ यांनी गावातील बखळ जागेवर राहणार बाळू दयाराम मोरे याला बोगस आधार कार्ड तयार करून बेपत्ता असलेल्या लक्ष्मण कौतिक पाटीलच्या जागी बसवले व त्यांच्या नावावर असलेली गट क्रमांक १०२ ची शेतीचा मालक बाळू दयाराम मोरे यास करवून ही शेतजमीन विकास पाटील, सचिन निवृत्ती माळी रा. वरणगाव यांनी खरेदी करून घेतली.
या प्रकरणात बोगस खरेदी व्यवहाराला साक्षीदार म्हणून आरोपी संदीप श्यामराव पाटील, शेख आरिफ शेख हुसेन रा. भुसावळ हे साक्षीदार झाले.
या व्यवहाराची कुजबुज गावात सुरू असताना त्याची माहिती वसंता भिल यांना लागली. त्यांनी खरेदी विक्री कार्यालय गाठत सर्व कागदपत्रे गोळा केली व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी बोदवड पोलिसात फिर्याद दिली. फसवणुकीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.