लोकमत न्यूज नेटवर्क
यावल : ना डीजेचा कर्कश आवाज, ना बँड, कोणत्याही दणदणाटाशिवाय ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणांनी शहरासह हद्दीतील पाच दिवसीय गणेशोत्सवाची मंगळवारी सांगता झाली.
अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, मुक्ताईनगरचे पोलीस उपअधीक्षक विवेक लावणे यांच्या उपस्थितीत येथील पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
शहरासह येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच दिवसीय गणेशोत्सवाची परंपरा आहे. त्यानुसार शहरातील २३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह तालुक्यातील दहीगाव ३, कोरपावली ४, डांभुर्णी ६, सावखेडासीम व नायगाव येथील प्रत्येकी १ अशा ३८ गणेश मंडळांनी मंगळवारी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाला निरोप दिला.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने नेमून दिलेल्या निर्बंधांनुसार गणेशोत्सव मंडळांनी तंतोतंत पालन करत सलग दुसऱ्या वर्षीही कोणतेही कर्कश वाद्य अथवा बँडचा वापर न करता श्रीगणेशाला निरोप दिला. रिमझिम पावसाच्या सरी श्रीगणेशाच्या जयजयकारात ‘श्रीं’ना निरोप दिला.
पेठमधील राजे संभाजी गणेशोत्सव मंडळाने पालखीद्वारे निरोप दिला. याकडे शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दुपारी लवकरच विसर्जनास सुरुवात केली. ती सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. यावर्षी गणेश मंडळांनी लहान मूर्तींना प्राधान्य दिले होते. तसेच शहरातील घरगुती गणेशोत्सवाचीही आज सांगता करण्यात आली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांनी भुसावळ व बोरावल रस्त्यावरील हतनूर पाटाच्या कालव्यात विसर्जन केले. विसर्जन उत्साहात पार पडले. कोणतीही अनुचित घटना घडली नाही.