कुटुंबाला घरी येऊन मारहाण केली, तरुणाने रेल्वेखाली झोकून आत्महत्या केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST2021-09-15T04:20:23+5:302021-09-15T04:20:23+5:30
जळगाव : दहीगाव संत येथील संदीप कोळी याने दारू पिऊन घरासमोर शिवीगाळ केली. त्याला आईने मनाई केल्यानंतर बाहेरगावातील नातेवाइकांना ...

कुटुंबाला घरी येऊन मारहाण केली, तरुणाने रेल्वेखाली झोकून आत्महत्या केली
जळगाव : दहीगाव संत येथील संदीप कोळी याने दारू पिऊन घरासमोर शिवीगाळ केली. त्याला आईने मनाई केल्यानंतर बाहेरगावातील नातेवाइकांना बोलावून कुटुंबीयांना मारहाण केल्याच्या संतापात सागर गणेश खडसे (वय २२, रा. दहीगाव संत, ता. पाचोरा) या तरुणाने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. १४) सकाळी ८ वाजता म्हसावद, ता.जळगाव येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ८ वाजता म्हसावद येथे अपलाइनवर खांब क्र. ३९४/११/१२ समोर धावत्या रेल्वेखाली झोकून देत एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. म्हसावद दूरक्षेत्राचे स्वप्निल पाटील व हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला मृताची ओळख पटत नव्हती, मात्र गर्दी वाढल्याने दहीगाव संत येथील रहिवाशांनीच मृताला ओळखले, त्यानंतर त्याची ओळख पटली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. मुलाचा मृतदेह पाहून आई, वडिलांनी एकच हंबरडा फोडला. सोमवारी झालेल्या वादातूनच सागर याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. सागर याच्या पश्चात, आई कल्पना, वडील गणेश महादेव खडसे, भाऊ समाधान असा परिवार आहे. गणेश खडसे हे रिक्षाचालक आहेत.
दारूच्या कारणावरून वाद
सोमवारी दुपारी ४ वाजता सागर, समाधान या दोन्ही भावंडांसह त्याची आई कल्पनाबाई घरी असताना संदीप रघुनाथ कोळी हा त्यांच्या घराजवळ येऊन दारूच्या नशेत शिवीगाळ करीत होता, तेव्हा कल्पनाबाई यांनी त्यास दारू पिऊन येथे यायचे नाही असे बजावले असता त्याने दमदाटी करायला सुरुवात केली. त्याचवेळी संदीपची बहीण राधाबाई कोळी, मथुराबाई नामदेव शेजवळ, नामदेव भिका शेजवळ यांच्यासह लोहारा, कळमसरे येथील नातेवाइकांनी दोन्ही मुले व कल्पनाबाई यांना मारहाण करायला सुरुवात केली. या प्रकाराची माहिती मिळताच सागरचे वडील गणेश महादेव खडसे हे घरी आले. त्यांनाही या लोकांनी मारहाण केली. यात त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली. दरम्यान, या घटनेनंतर कल्पनाबाई यांनी पती व दोन्ही मुलांना घेऊन पाचोरा पोलीस ठाणे गाठले. वैद्यकीय उपचारानंतर समाधान नामदेव शेजवळ, संदीप रघुनाथ कोळी, राधाबाई कोळी, मथुराबाई नामदेव शेजवळ, नामदेव भिका शेजवळ यांच्याविरुद्ध दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.