जळगावात बनावट दारुचा कारखाना उद‌्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:47 IST2021-01-08T04:47:29+5:302021-01-08T04:47:29+5:30

जळगाव : एमआयडीसीला लागून असलेल्या मन्यारखेडा शिवारात पार्टेशनच्या घरात सुरू असलेला बनावट दारु निर्मितीचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ...

Fake liquor factory demolished in Jalgaon | जळगावात बनावट दारुचा कारखाना उद‌्ध्वस्त

जळगावात बनावट दारुचा कारखाना उद‌्ध्वस्त

जळगाव : एमआयडीसीला लागून असलेल्या मन्यारखेडा शिवारात पार्टेशनच्या घरात सुरू असलेला बनावट दारु निर्मितीचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी दुपारी उद‌्ध्वस्त केला. त्यात साडेतीन लाखाच्या दारुसह, स्पिरीट, मशिनरी व वाहने मिळून साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. गणेश भाऊराव कोळी (२४, रा.शिरपूर), सुखदेव पूनमचंद पवार (३०,रा.चिखली, ता.शहादा), गणेश हिरालाल सोनवणे (२८,रा.अयोध्या नगर), सियाराम हरीराम पावरा (१९,रा.शिव कॉलनी) व भाईदास शिवला पावरा (१८,रा.धरबापाडा,मोराडी, ता.शिरपूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसीला लागूनच मन्यारखेडा शिवारात पत्री व पार्टेशनच्या घरात आठवडाभरापासून दारु निर्मिती केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक सी.एच.पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार अधीक्षक सीमा झावरे, बुलडाण्याचे निरीक्षक दीपक शेवाळे, दुय्यम निरीक्षक विकास पाटील, आनंद पाटील, सागर पाटील, सहायक फौजदार डी.बी.पाटील, जवान अजय गावंडे, कुणाल सोनवणे, नितीन पाटील, मुकेश पाटील, अमोल पाटील, राहूल सोनवणे व नंदू नन्नवरे यांच्या पथकाने दुपारी कारखान्याला घेराव घातला. त्यामुळे एकालाही पलायन करण्यास संधी मिळाली नाही. दारु निर्मिती करतानाच पाचही जणांना ताब्यात घेतले. मशीन, दारु, स्पिरीट, बाटल्या व इतर साहित्यासह चारचाकी आणि दुचाकी ताब्यात घेतली.

धुळे कनेक्शन उघड

ताब्यात घेण्यात आलेले गणेश कोळी, सुखदेव व भाईदास हे धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून, फक्त दारु निर्मितीसाठी ते जळगावात येत होते. येथे तयार झालेली दारु जळगाव व धुळे या दोन जिल्ह्यातील ढाब्यांवर विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे. ज्या जागेत हा कारखाना उभारण्यात आला ती जागा महिलेच्या नावावर आहे. जागा मालकालाही आरोपी केले जाणार असल्याची माहिती निरीक्षक सी.एस.पाटील यांनी दिली.

Web Title: Fake liquor factory demolished in Jalgaon