चाळीसगावच्या बचत गटाच्या नावाने धुळ्यात बनावट खाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST2021-07-07T04:21:46+5:302021-07-07T04:21:46+5:30
याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी पाठविण्यात आल्या असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, लता सुभाष अग्रवाल या चाळीसगाव येथील रहिवासी असून ...

चाळीसगावच्या बचत गटाच्या नावाने धुळ्यात बनावट खाते
याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी पाठविण्यात आल्या असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, लता सुभाष अग्रवाल या चाळीसगाव येथील रहिवासी असून त्या चाळीसगावच्या जय माता दी महिला स्वयंसाहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा व माता माधवी महिला स्वयंसाहाय्यता बचत गटाच्या सदस्या आहेत. त्यांनी १ जुलैला या बचत गटाच्या नावाने धुळे येथील बोगस पुरवठादाराने एकात्मिक बालविकास प्रकल्प (नागरी) भुसावळ या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आधार घेत बचत गटातील सदस्यांच्या खोट्या सह्या करून परस्पर अनुदान लाटल्याचे उघडकीस आले होते. यानंतरच्या चौकशीत धुळे येथील त्या बोगस पुरवठादारांनी या दोन्ही बचत गटांच्या नावाने धुळे येथील बँक ऑफ इंडिया, शाखा धुळे येथे दिनांक ३१ ऑगस्ट २००८ रोजी खाते क्रमांक ०६९०१०११००००३७९ जय मातादी स्वयंसाहाय्यता महिला बचत व माता माधवी स्वयंसाहाय्यता महिला बचत गट या नावाने खाते क्रमांक ०६९०१०११००००३७८ यावर खोट्या सह्या करून उघडले असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
त्या पुरवठादाराने चाळीसगावच्या बचत गटाच्या नावाने विविध ठिकाणी पोषण आहाराची कामे घेऊन या खात्यात परस्पर रक्कम वर्ग केली आहे. धुळे येथे चाळीसगावच्या बचत गटाच्या नावाने खाते उघडलेच कसे? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. बचत गटाच्या नावाने खाते उघडताना त्या फॉर्मवर बचत गटातील अध्यक्षा, सचिव यांच्या सह्या व बचत गटाचे शिक्के असतात. तरीही अध्यक्षांच्या कुठेही सह्या व पूर्वपरवानगी न घेता परस्पर खाते उघडले गेले. याबाबत धुळे येथील बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकांनी शहानिशा का केली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे अध्यक्षा लता अग्रवाल यांनी म्हटले आहे.