मोक्याच्या जागांवर डोळा
By Admin | Updated: August 1, 2014 15:28 IST2014-08-01T15:28:51+5:302014-08-01T15:28:51+5:30
शहरातील मालमत्तांचे भाव दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळेच मालमत्ता बळकावण्याचे किंवा जबरदस्तीने घर रिकामे करून घेण्याचे प्रकार वाढले आहेत.

मोक्याच्या जागांवर डोळा
जळगाव : शहरातील मालमत्तांचे भाव दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळेच मालमत्ता बळकावण्याचे किंवा जबरदस्तीने घर रिकामे करून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. नुकत्याच नवीपेठेत अविनाश लाँड्रीचा दुकानातील सामान रातोरात हलवून ताबा घेतल्याच्या प्रकारानंतर हा विषय अधिकच चर्चेत आला आहे.
मुंबई, पुण्याच्या पाठोपाठ जळगावातील मालमत्तांचे भाव असल्याने या महानगरांप्रमाणेच जळगावातही मालमत्ता हडप करणारे अनेक लहान-मोठे रॅकेट कार्यरत आहेत. मोक्याची जागा हेरून ती साम, दाम, दंड, भेद याचा वापर करीत हस्तगत करण्याचे उद्योग सुरू असतात.
रेल्वे स्टेशनजवळ सेवाश्रम लॉजच्या मागील बाजूला असलेल्या एका इमारतीतील भाडेकरूंना अतिक्रमण विभागातील काही अधिकार्यांना हाताशी धरून अतिक्रमण तोडण्याबाबतच्या नोटीस बजावून धमकाविण्याचे व नंतर सोयीस्करपणे तडजोडीसाठी मार्ग सुचविण्याचा प्रकार घडला.
दाणाबाजारात मूळ मालकाकडून मालमत्ता घेऊन त्याला दुसरी जागा देण्याचे आश्वासन देऊन नंतर फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. तर भवानीपेठेतही असाच फसवणूक करून व दमदाटी करून जागेचा ताबा घेतल्याचा प्रकार घडला आहे. नवीपेठेतही एका इमारतीतील भाडेकरूंना असाच त्रास देऊन जागा खाली करून घेण्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही फारसा उपयोग होत नाही. कारण या रॅकेटमध्ये राजकीय क्षेत्रातील तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील मंडळी असल्याने पोलिसांना 'मॅनेज' करण्यातही ते तरबेज आहेत. तर न्यायालयात दाद मागितली तर हे विषय दिवाणी प्रकारात मोडतात. दिवाणी दावे वर्षानुवर्ष चालत असल्याने सर्वसामान्य माणसाला त्यामुळे कुठे दाद मागावी? असा प्रश्न पडतो.
त्यामुळे मुला-बाळांच्या सुरक्षेचा विचार करीत जागेवर पाणी सोडावे लागते. केवळ इमारती किंवा घरच नव्हे तर रिकामे प्लॉटही अशाच प्रकारचे हातखंडे वापरून बळकावले जाण्याचे प्रकार वाढले आहेत.
अशी आहे मॉडस ऑपरेंडी
■ रिकामा प्लॉट मोक्याच्या जागी असेल व मालक तो प्लॉट विकण्यास तयार नसेल तर सरळ त्या मालकाच्या नावाने दुसराच व्यक्ती उभा करून बोगस खरेदी-विक्री केली जाते. त्यानंतर मूळ मालकाला ही बाब लक्षात आली तरीही न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागतो. त्यात अनेक वर्ष लागतात. त्यामुळे मूळ मालक त्रस्त होऊन मिळेल त्या रक्कमेवर तडजोड करून मोकळा होतो.
■ जुनी इमारत असली की त्यातील भाडेकरूही ४0-५0 वर्ष जुने असतात. मूळ मालकाजवळ त्यांना पैसे देऊन इमारत रिकामी करून घेण्याची क्षमता नसते. त्यामुळे बहुतांश वेळा मूळ मालक अशी इमारत भाडेकरू असतानाच अशा रॅकेटला विकून टाकतो. ते भाडेकरूंना आमिष दाखवून जागा खाली करून घेतात. जे भाडेकरून आमिषाला बळी पडत नाहीत, त्यांना त्रास देणे सुरू होते. कधी त्या कुटुंबातील महिला, मुलींच्या मागे गुंड पाठवून घाबरविण्याचे प्रकार केले जातात. तर कधी इमारतीत जिन्याच्या आजूबाजूला २४ तास गुंड बसविले जातात. तेथेच त्यांचे दारू पिणे, पत्ते खेळण्याचे उद्योग चालतात. जिन्याचे नुकसान करून खिळखिळा केला जातो. या त्रासाला कंटाळून अखेर उर्वरित भाडेकरूही जागा खाली करून देतात.
■ तर एखादी मोक्याच्या जागेवरील मालमत्ता आवडली परंतु मूळ मालक ती विकायला तयार नसला तर त्याच्या जवळच्या व्यक्तींना हाताशी धरून आमिष दाखविले जाते. तरीही न ऐकल्यास जागा मालक कोणत्या गोष्टीला घाबरतो? कमकुवत बाजू कोणती? याची माहिती काढून त्यानुसार घाबरविले जाते.