आरटीई प्रवेशासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:15+5:302021-07-02T04:12:15+5:30
जळगाव - २५ टक्के कोट्यांतर्गत जाहीर झालेल्या पहिल्या सोडतीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ ...

आरटीई प्रवेशासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ
जळगाव - २५ टक्के कोट्यांतर्गत जाहीर झालेल्या पहिल्या सोडतीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येत असतो. यासाठी दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असते. यंदा जळगाव जिल्ह्यातील २९६ शाळांमधील ३ हजार ६५ जागांसाठी आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या जागांसाठी जिल्हाभरातून शिक्षण विभागाला ५ हजार ९३९ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. नुकतीच काही दिवसांपूर्वी आरटीईची सोडत काढण्यात आली असून त्यात २ हजार ६९५ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांची नावे प्रतीक्षायादीत समाविष्ट करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत प्रवेश निश्चितीची संधी देण्यात आली होती. त्याअंतर्गत आतापर्यंत १ हजार ९६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. दरम्यान, ओटीपीची तांत्रिक अडचण उद्भवल्यामुळे प्रवेश निश्चित करण्यास उशीर होत असल्याची बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर आता ९ जुलैपर्यंत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
...प्रवेश रद्द केला जाईल
एकाच पालकांनी दोन अर्ज भरून जर त्यांना लॉटरी लागली, तरी त्यांचा प्रवेश रद्द केला जाणार आहे. तसेच प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी शाळेत जाऊ नये. निवडयादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उर्वरित रिक्त जागांकरिता प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रमानुसार एसएमएस प्राप्त झाल्यानंतर प्रिंट काढावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
एकूण शाळा - २९६
राखीव जागा - ३०६५
प्राप्त अर्ज - ५९३९
तात्पुरते प्रवेश -२०१०
प्रवेश निश्चित - १९६२