अपंग प्रमाणपत्रांचा गोरखधंदा उघड
By Admin | Updated: October 9, 2014 15:00 IST2014-10-09T15:00:43+5:302014-10-09T15:00:43+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात अपंग प्रमाणपत्रांच्या गोरखधंद्याचा भंडाफोड झाला आहे.

अपंग प्रमाणपत्रांचा गोरखधंदा उघड
जळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयात अपंग प्रमाणपत्रांच्या गोरखधंद्याचा भंडाफोड झाला आहे. चार व्यक्तींना कर्णबधिर असल्याचे बोगस प्रमाणपत्रे देण्यात येत असल्याबाबतचा प्रकार कार्डियॉलॉजिस्टच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला असून याप्रकरणी मुख्य सूत्रधाराचा शोध घेणे सुरू आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय अपंग प्रमाणपत्रांचा गोरखधंदा सुरू होता. त्यामुळे दलालही सक्रिय होते. चार व्यक्तींच्या नावाची कर्णबधिर असल्याबाबतची बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आली आहेत. मात्र या प्रमाणपत्रांवर माझ्या सह्या झालेल्या नाहीत. या प्रकरणात जिल्हा रुग्णालयातील व्यक्तींचा समावेश असल्याबाबतची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे मुंबईच्या अपंग तपासणी कार्यालयातील मुख्य सर्व्हरवरून ही प्रमाणपत्रे कोणत्या संगणकामध्ये तयार करण्यात आलेली आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे. त्यासंदर्भात मुंबईच्या कार्यालयाला ई-मेल करण्यात आला आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.के.शेळके म्हणाले. कर्णबधिरांची प्रमाणपत्रे जप्त केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.के. शेळके यांनी अपंगांची तपासणी करणारे डॉक्टर आणि त्यांच्या सहकारी कर्मचार्यांची तातडीची बैठक त्यांच्या कार्यालयात बोलाविली होती.
-------------
कान, नाक, घसा विभागातील कार्डियॉलॉजिस्ट सुनील पाटील यांनी ३२ अपंगांची प्रमाणपत्र ऑनलाइन वितरण प्रणालीव्दारे तपासणीसाठी पाठविलेले होते. मात्र मंगळवारी त्यांनी पाठविलेल्या नावांबाबत खात्री केली असता त्यांना ऑनलाइन प्रणालीमध्ये ३२ ऐवजी ३६ नावे आढळून आली. त्यांना शंका आली. त्यांनी संबंधित चार इसमांच्या देण्यात आलेल्या माहितीबाबत खात्री केली असता कोणताही पुरावा आढळून आला नाही. प्रमाणपत्रांवर नावे असलेल्या व्यक्तींच्या नावे केस पेपर आढळून आला नाही. तसेच त्यांची तपासणीही केल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे पाटील यांनी याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.के.शेळके यांच्याकडे तक्रार केली. अपंग, कर्णबधिर आणि अंध प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयात संगणक प्रणालीव्दारे वितरीत करण्यात येतात. या संगणकांना पासवर्ड देण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रमाणपत्र वितरीत करणारे डॉक्टर आणि त्यांच्यासोबत काम करणार्या कर्मचार्यांचा यामध्ये सहभाग असल्याबाबतची शंका व्यक्त करण्यात येत आहे.