विस्तारवादी भूमिकेला गटबाजीचा ‘अभिषेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:16 IST2021-09-13T04:16:54+5:302021-09-13T04:16:54+5:30
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून काॅंग्रेसच्या वाटेवर असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात गटबाजीला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ नेत्यांकडून काम करण्यास ...

विस्तारवादी भूमिकेला गटबाजीचा ‘अभिषेक’
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून काॅंग्रेसच्या वाटेवर असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात गटबाजीला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ नेत्यांकडून काम करण्यास अडथळे निर्माण केले जात असल्याचे कारण पुढे करीत माजी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी वादंग उठविले आहे. या लेटर बाॅम्बनंतर युवा विरूद्ध ज्येष्ठ असा वाद आता राष्ट्रवादीत सुरु झाला आहे.
सोशल मिडियावरील आक्षेपार्ह टिपणीपासून झाली सुरुवात
काही महिन्यांपूर्वी सोशल मिडियावर आक्षेपार्ह टिपणी टाकल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. त्याच वेळी युवाविरूद्ध ज्येष्ठ अशा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. जाहिर स्वरूपात झालेल्या या वादानंतर याबाबतची माहिती पक्ष नेत्तृत्वाकडे पोहचविण्यात आली.
मुंबईतील बैठकीत झाली निर्णायक चर्चा
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची काही दिवसांपूर्वी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत सहभागी झालेल्या सर्वांनी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्याबाबत तक्रारी केल्या होत्या. यावेळी महानगराध्यक्षपदासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे समर्थक व माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या बैठकीत महानगरची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली.
अभिषेक पाटलांच्या लेटर बाॅम्बनंतर वादंग
ज्येष्ठ नेत्यांकडून आपल्याला काम करू दिले जात नसल्याने आपल्याला महानगराध्यक्षपदावरून कार्यमुक्त करावे असे पत्र अभिषेक पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठविले. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आरोपप्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत.
राष्ट्रवादीचे पाच वरून एक आमदार
भारतीय जनता पार्टींचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा कायम चांगला जोर राहिला आहे. पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह पाच राष्ट्रवादीचे आमदार व एक सहयोगी आमदार या जिल्ह्यात राहिले आहे. मात्र गेल्या दोन पंचवार्षिकपासून राष्ट्रवादीला एक पेक्षा जास्त आमदार विजयी करता आलेला नाही. गेल्यावेळी एकमेव आमदार डाॅ.सतीश पाटील आणि आता अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. जळगाव लोकसभा निवडणुकीच्या वेळीदेखील राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे उमेदवार व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना मोठ्या मतांनी पराभव पत्करावा लागला आहे.
अभिषेक पाटलांच्या दबाव तंत्रानंतर ज्येष्ठांचा इशारा
दरम्यान, माजी महानगरप्रमुख अभिषेक पाटील यांच्याकडून समर्थकांच्या माध्यमातून दबाव तंत्राचा अवलंब केला जात असल्याचा आरोप आता होत आहे. मात्र पक्ष संघटनेची घडी विस्कळीत होईल असे कोणतेही कृत्य करू नये असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील यांनी केले आहे. हे सांगत असताना पक्षाची करण्यात येणारी बदनामी खपवून घेतली जाणार नाही असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.