दोन वर्षे हद्दपार, सहाच महिन्यांत शहरात सुरा घेऊन फिरू लागला
By विजय.सैतवाल | Updated: September 25, 2023 15:42 IST2023-09-25T15:42:12+5:302023-09-25T15:42:25+5:30
शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दोन वर्षे हद्दपार, सहाच महिन्यांत शहरात सुरा घेऊन फिरू लागला
जळगाव : दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केलेले असतानादेखील संदीप भास्कर ढोके (२४, रा. गेंदालाल मिल) हा सुरा घेऊन फिरताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मार्च महिन्यात त्याला हद्दपार केले होते, मात्र साडेसहा महिने होत नाही तोच हा तरुण शहरात फिरताना आढळून आला.
वेगवेगळे गुन्हे दाखल असलेल्या संदीप ढोके याला पोलिस अधीक्षकांनी दि. ३ मार्च २०२३ रोजी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले होते. मात्र हा तरुण गेंदालाल मिल भागात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिस तेथे पोहोचले असता तो सुरा घेऊन फिरताना आढळला.
याप्रकरणी पो.कॉ. रतनहरी गिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रफुल्ल धांडे करीत आहेत.