पुन्हा हद्दपारी कागदोपत्रीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:38 IST2021-09-02T04:38:06+5:302021-09-02T04:38:06+5:30
वार्तापत्र (क्राईम) सुनील पाटील पुन्हा हद्दपारी कागदोपत्रीच ! काही महिन्यापूर्वी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी एकाच वेळी गुन्हेगारी टोळ्या ...

पुन्हा हद्दपारी कागदोपत्रीच !
वार्तापत्र (क्राईम)
सुनील पाटील
पुन्हा हद्दपारी कागदोपत्रीच !
काही महिन्यापूर्वी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी एकाच वेळी गुन्हेगारी टोळ्या जिल्ह्यातून हद्दपार केल्या. आज ६० पेक्षा जास्त गुन्हेगार हद्दपार असले तरी त्यातील खरोखर किती शहराच्या बाहेर आहेत आणि किती आपआपल्या शहरात आहे हा संशोधनाचा भाग असला तरी हद्दपारी ही कागदावरच असल्याचे वारंवार सिद्ध झालेले आहे. शनी पेठ पोलीस ठाण्याची नव्यानेच धुरा सांभाळलेल्या बळीराम हिरे यांनी सलग दोन दिवस हद्दपार गुन्हेगार पकडले. हद्दपार असताना ते शहरातच काय जिल्ह्यातही दिसणे अपेक्षित नाही. मात्र दुर्दैव असे की, अनेक गुन्हेगार आजही कागदोपत्री हजर असून ते बिनधास्तपणे वावरत असल्याचे दिसून येत आहे. प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथकाने मनावर घेतले तर, एकही हद्दपार गुन्हेगार शहरात दिसणार नाही. रेकॉर्डवरील गुन्हेगार असो की, हद्दपार गुन्हेगारांची यादीच पोलीस ठाण्यातील फलकावर लावणे बंधनकारक आहे. रामानंद नगर पोलीस ठाणे वगळता एकाही पोलीस ठाण्यात ही यादी लावलेली नाही. दर्शनी भागात यादी लावलेली दिसली की, कोण हद्दपार आहे याची माहिती जनतेला होते, तो गुन्हेगार शहरात वावरत असल्याचे निदर्शनास आले तर त्याची माहिती पोलिसांना मिळू शकते.
गुन्हेगार दत्तक योजना देखील अजूनही प्रभावीपणे राबविली जात नसल्याचेही त्यामागील एक मोठे कारण आहे. त्याशिवाय बीट प्रमुख असो किंवा गुन्हे शोध पथके यांचा गुन्हेगारांवर वचक संपलेला आहे. अलीकडच्या काळात प्राणघातक हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. गेल्या सात महिन्यात खुनाचे ३२ तर खुनाचा प्रयत्न केल्याचे ६२ गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेले आहेत. हद्दपारी, प्रतिबंधात्मक कारवाईचे हत्यार सातत्याने उपसत राहिले तरच गुन्हेगारांमध्ये धाक तयार होऊ शकतो. सर्वच बाबी पोलीस अधीक्षक स्वत: करु शकत नाही, मात्र त्याखालच्या यंत्रणेचीही काही जबाबदारी आहे, त्यांच्याकडून ती प्रामाणिकपणे निभावणे अपेक्षित आहे.